Techie Woman Commites Suicide: काही दिवसांपूर्वी पुण्यात घडलेल्या वैशाली हगवणे आत्महत्या प्रकरणावरून कौटुंबिक हिंसाचाराच्या मुद्द्यावर मोठी चर्चा पाहायला मिळाली. आता अशाच प्रकारची एक घटना बंगळुरूमध्ये समोर आली आहे. एका सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेनं सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. सदर महिलेच्या कुटुंबीयांनी कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला असून पोलीस या आरोपांमधील सत्यासत्यता तपासून पाहात आहेत. मुलीचं लग्न लावून देताना १५ लाख रुपये रोख, १५० ग्रॅम सोनं आणि घरातील महागड्या वस्तू हुंडा म्हणून दिल्याचंही कुटुंबीयांनी सांगितलं आहे. एनडीटीव्हीनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

ही घटना दक्षिण बंगळुरूच्या सद्दागुंटेपलया भागात घडली. आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव शिल्पा असून तिच्या पतीचं नाव प्रवीण आहे. अडीच वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. शिल्पाप्रमाणेच तिचा पतीदेखील सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. विवाहापूर्वी शिल्पा इन्फोसिसमध्ये काम करत होती. मात्र, विवाहानंतर तिने नोकरी सोडली. प्रवीणदेखील ओरॅकल कंपनीत नोकरीला होता. पण लग्नानंतर वर्षभरात त्यानं नोकरी सोडली आणि स्वतंत्र व्यवसाय सुरू केला होता. या दाम्पत्याला दीड वर्षाचा मुलगादेखील आहे.

शिल्पाच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रवीणच्या कुटुंबीयांनी विवाहाच्या वेळी १५ लाख रोख, १५० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि घरातील इतर महागड्या वस्तूंची मागणी केली होती. ही मागणी शिल्पाच्या कुटुंबीयांनी पूर्णदेखील केली होती. पण त्यानंतरदेखील शिल्पाच्या सासरकडच्या लोकांनी आणखी पैसे आणि दागिन्यांची मागणी करायला सुरुवात केली. त्यासाठी शिल्पावर दबाव टाकायला सुरुवात केली. वारंवार होणारी हेटाळणी, मानसिक छळ आणि टोमण्यांमुळेच शिल्पानं आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

रंगावरूनही केली जायची हेटाळणी

दरम्यान, शिल्पाला तिच्या रंगावरूनही सासरच्या लोकांकडून सातत्याने टोमणे मारले जायचे, असाही आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. “तू रंगानं काळी आहेस. माझ्या मुलाला शोभत नाहीस. त्याला सोडून दे. आम्ही त्याच्यासाठी दुसरी चांगली मुलगी शोधू”, अशा प्रकारची हेटाळणी शिल्पाला तिच्या सासूकडून सहन करावी लागायची, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

पतीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

दरम्यान, शिल्पाच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून बंगळुरू पोलिसांनी प्रवीणला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. एसीपी दर्जाचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. शवविच्छेदनानंतर शिल्पाचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. “पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली असून त्यावर आधारित हुंडाबळीचा गुन्हा आम्ही दाखल केला आहे. पतीची चौकशी चालू असून तक्रारींमध्ये किती तथ्य आहे याचा आढावा आम्ही घेत आहोत”, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.