Bengaluru auto-rickshaw driver Viral Video : महाराष्ट्रात मराठी आणि कर्नाटकात कन्नड भाषेचा वापर यावरून काही भागात तणाव वाढल्याचे चित्र काही दिवसांपासून पाहायाल मिळत आहे. मराठी बोलण्यास नकार दिल्याच्या मुद्द्यावर काही परप्रांतियांना मारहाण झाल्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्थानिक भाषेचा आग्रह धरण्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असतानाच बंगळुरू येथून एक हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर आला आहे. एक सामान्य रिक्षा चालक आणि एका तरूणी यांच्यातील संभाषणाच्या या व्हिडीओने इंटरनेटवर अनेकांची मने जिंकली आहेत, ही क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ ख्याती श्री या इंस्टाग्राम युजरने शेअर केला आहे, ज्यामध्ये ती एका स्थानिक ऑटो चालकाकडून काही कन्नड भाषेतील सोपी वाक्य शिकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. रिक्षा चालक देखील हिंदीत उच्चारलेलं वाक्य कन्नड भाषेत कसं बोलायचं हे सांगताना धिसत आहे. यानंतर ती बंगळुरूमध्ये भाषेवरून झालेल्या वादाबाबत या ऑटो चालकाला विचारते, यावर रिक्षा चालक तिला जे उत्तर देतो त्या उत्तराने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.
रिक्षा चालक काय म्हणाला?
हिंदी-कन्नड वादाचे व्हिडीओ व्हायरल होतात त्याबद्दल विचारले असता रिक्षा चालक म्हणाला की, “थोडा रहेता है ना आदमी लोक, थोडा दारू-वारू पिके… ऐसा, ऐसा करके थोडा झगडा होता है, फिर भी नो प्रॉब्लेम, अच्छेसे रहेते है इधार… बाय मिस्टेक ऐसा हो जाता है, गुस्से में, घरका प्रॉब्लेम राहा, कमानेका प्रॉब्लेम है तै हो जाता है… बेंगलोर के अंदर सब फर्स्ट क्लास” असं थेट आणि सरळ-साधं उत्तर रिक्षा चालकानं या तरूणीला दिलं. या रिक्षा चालकाच्या म्हणण्यानुसार, बंगळुरमध्ये बऱ्याचदा दारू पिल्याने किंवा घरचा तणाव, कमाई नसल्याने लोक भांडण करतात. अन्यथा बंगळुरू शहरात काही समस्या नाही, सर्व काही व्यवस्थित सुरू आहे.
कर्नाटकमध्ये चार महिन्यांपासून राहत असलेल्या ख्यातीने इन्स्टाग्राम पोस्टच्या खाली मोठं खॅप्शन देखील लिहिलं आहे. ज्यामध्ये तिने तिचा कर्नाटकमध्ये राहण्याचा अनुभव शेअर केला आहे. हिंदी विरूद्ध कन्नड असा वादाबद्दल ऐकून देखील तिला राज्यात प्रवास करताना कोणतीही अडचण आली नाही असे तिने नमूद खेले आहे. “जोपर्यंत तुम्ही सन्मानाने वागता, तोपर्यंत तुम्ही कोणत्या भाषेत बोलता याची कोणीही पर्वा करत नाही,” असे तिने लिहिले आहे. “इंग्रजी येत असेल तर नक्कीच मदत होते, पण भाषेपेक्षा ते अॅटिट्यूडशी जास्त संबंधीत आहे.”
या व्हिडीओला अनेकांनी लाईक केले आहे. तसेच नेटकरी व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये या ऑटो चालकाचे कौतुक देखील करत आहेत. एकाने कमेंट केली आहे की, “गुड अवेअरनेस डियर…. एकमेकांचा आदर करा… बंगळुरूचे लोक इतकेही वाईट नाहीत! मी येथे २५ वर्षांपासून राहतो आहे आणि मला कधीही कोणतीही अडचण आली नाही.”
दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटले आहे की, “कन्नड लोक स्वागत करणारे आहेत, पण एकमेकांबद्दल आदर असलाच पाहिजे. जर तुम्हाला इथे राहायचे असेल, तर कन्नड शिका, कन्नड बोला आणि कन्नडचा आदर करा… ही सक्ती नाहीये – ही एक साहजिक अपेक्षा आहे. जगात सर्वत्र लोक त्यांच्या भाषेला आणि संस्कृतीला महत्त्व देतात.”