Bengaluru Man Beheads Wife: बंगळुरूमध्ये विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून झालेल्या वादानंतर पतीने आपल्या पत्नीचे शीर कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेतील आरोपी पतीचे नाव शंकर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीची हत्या केल्यानंतर शंकर तिचे कापलेले शीर त्याच्या स्कूटरवरून जवळच्या पोलीस ठाण्यात घेऊन गेला आणि गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
दरम्यान, ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा अनेकल तालुक्यातील चांदापुरा जवळील हीलालिगे गावात घडली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांच्या मते, या जोडप्याचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना चार वर्षांची मुलगी आहे.
पोलिसांनी सांगितले की, शंकर कोरमंगळ येथे एका खाजगी कंपनीत काम करत होता, तर मृत पत्नी बोम्मासंद्रा येथे काम करत होती. चौकशीदरम्यान शंकरने पोलिसांना सांगितले की, त्याला काही दिवसांपूर्वी पत्नीचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध आहेत, असे समजले होते. यामुळे त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर ती तिच्या माहेरी निघून गेली होती.
दरम्यान, हा वाद मिटवण्यासाठी मृत पत्नी शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घरी परतली होती. मुलगी लहान असल्यामुळे तिला पतीशी तडजोड करायची होती. याचबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचे तिने नाकारले होते, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पत्नी घरी आल्यानंतर आरोपी पती शंकर आणि तिच्यात पुन्हा एकदा जोरदार वाद झाला, आणि वादाच्या दरम्यान पती शंकरने पत्नीचे विळ्याने शीर कापले. त्यानंतर पती शंकरने पत्नीचे धड घरातच टाकले आणि तिचे कापलेले शीर त्याच्या स्कूटरवर पोलीस ठाण्यात आणले.
प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, शंकरने पत्नीला मारण्याचा कट आधीच आखला होता. यासाठी त्याने त्याच्या घराजवळील एका दुकानातून एक विळा विकत घेतला होता. या प्रकरणी पतीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
“काल रात्री या जोडप्यात भांडण झाले. भांडणाच्या दरम्यान, पतीने पत्नीला मारहाण करत तिची निर्घृण हत्या केली. त्याने तिचे शीर कापले आणि नंतर ते पोलीस ठाण्यात आणले. यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर आम्ही त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत पत्नीचे कथित विवाहबाह्य संबंध होते. या जोडप्याला एक मूलही आहे, गेल्या आठवड्यापासून या प्रकरणावरून त्यांचे भांडण सुरू होते,” असे बंगळुरू ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सीके बाबा यांनी सांगितले.