Bengaluru Metro Station Bomb Threat Over Divorced Wife Harassment: बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या घटस्फोटित पत्नीचा कामाच्या वेळेनंतर “मानसिक छळ” केल्यास मेट्रो स्टेशन उडवून दिले जाईल अशी धमकी देण्याच्या आरोपावरून एका ६२ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेला हा व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत ईमेल आयडीवर १३ नोव्हेंबर रोजी रात्री ११.२५ वाजता हा धमकीचा ईमेल आला होता.
या ईमेलमध्ये म्हटले होते की, “जर मला, तुमचे मेट्रो कर्मचारी ड्युटीच्या वेळेनंतर माझ्या घटस्फोटित पत्नी पद्मिनीला मानसिक त्रास देत आहेत असे समजले, तर तुमच्या एका मेट्रो स्टेशनवर स्फोट होईल. त्यामुळे सावध राहा. मी देखील दहशतवादी प्रवृत्तीचा कन्नड देशभक्त आहे.”
पोलिसांनी ईमेल पाठवणाऱ्याची ओळख पटवली असून, त्याचे नाव राजीव आहे आणि तो बेळथूरचा रहिवासी आहे.
बंगळुरू मध्यचे पोलीस उपायुक्त अक्षय एम. हक्के यांनी सांगितले की, “आरोपी राजीव गेल्या पाच वर्षांपासून मानसिक आजारासाठी बेंगळुरूच्या निमहांस येथे उपचार घेत आहे. डिप्लोमाधारक राजीव विवाहित होता. १५ वर्षांपूर्वी त्याचा घटस्फोट झाला होता. धमकीच्या ईमेलमध्ये नमूद केल्याप्रमाणे त्याची घटस्फोटित पत्नी मेट्रोची कर्मचारी नाही.”
पोलीस उपायुक्त अक्षय एम. हक्के पुढे म्हणाले की, राजीव भाड्याच्या खोलीत एकटाच राहतो. त्याचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य त्याला मदत करतात.
बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे सहाय्यक कार्यकारी अभियंता (सायबर सुरक्षा) रथीश थॉमस यांनी ईमेल धमकीबद्दल तक्रार दाखल केल्यानंतर विल्सन गार्डन पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.
