बंगळुरू पोलिसांनी एका पोलीस हवालदाराला अटक केली आहे. ऑनलाईन सट्टेबाजीत मोठं आर्थिक नुकसान झाल्यानंतर हा हवालदार चोऱ्या करू लागला होता. त्याची चोरी पकडली गेल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटकेनंतर त्याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. हा हवालदार कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पोलीस चौकीत कार्यरत होता. यल्लप्पा सन्ना शरणप्पा असं त्याचं नाव आहे. यल्लप्पा क्रिकेट बेटिंग अ‍ॅप्सवर सट्टा लावायचा. सट्टा लावण्यासाठी त्याने २० लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. बंगळुरू विद्यापीठाजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात चोरी झाली होती. या चोरीचा तपास करताना पोलीस यल्लप्पा शरणप्पापर्यंत पोहोचले.

बंगळुरू विद्यापीठाजवळ मल्लाथहल्लीमध्ये राहणाऱ्या मनोरमा बीके यांनी त्यांच्या घरातून १३ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ज्ञानभारती पोलिसांनी परिसरातील ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फूटेज तपासलं. त्यात पोलिसांना एक संशयित बाइक सापडली. चोराने या बाइकचा वापर केल्याचं सीसीटीव्ही फूटेजवरून लक्षात आलं होतं. पोलिसांनी ही बाइक शोधून काढली. परंतु, त्यावर बनावट रजिस्ट्रेशन प्लेट लावण्यात आली होती.

पोलिसांनी बाइकच्या चेसिस नंबरवरून बाइकच्या मालकाशी संपर्क साधला. तेव्हा बाइकच्या मालकाने सांगितलं की त्याने ती बाइक पोलीस हवालदार यल्लप्पा शरणप्पाला विकली आहे. त्यानंतर पोलिसांनी यल्लप्पा शरणप्पाला ताब्यात घेतलं. पोलिसांनी यल्लप्पाच्या बोटांचे ठसे घेतले आणि तपास सुरू केल्यानंतर पोलिसांना समजलं की याआधी चिक्कजला आणि चंद्रा लेआऊट येथे झालेल्या चोरीच्या घटनांमधील चोराच्या बोटांचे ठसे आणि यल्लप्पाच्या बोटांचे ठसे सारखेच आहेत.

एका पोलीस अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की यल्लप्पाने ऑगस्ट २०२३ मध्ये चिक्कजलातील पोस्टाच्या कार्यालयात आणि सप्टेंबर २०२३ मध्ये चंद्रा लेआऊट येथील एका घरात चोरी केली होती. मल्लाथहल्लीतल्या चोरीचा तपास करत असताना आधीच्या दोन चोरीच्या घटनांचा छडा लावता आला. या तिन्ही चोऱ्या यल्लप्पानेच केल्याचं समोर आलं आहे.

हे ही वाचा >> इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाबाबत शरद पवारांच्या भूमिकेवर केंद्रीय मंत्र्याचा संताप; म्हणाले, “ही कुजकी मानसिकता…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की याआधीदेखील यल्लप्पावर चोरीचे आरोप झाले आहेत. तो पूर्वी बानाशंकरी पोलीस ठाण्यात काम करत होता. तेव्हा त्याची काही चोरांशी मैत्री झाली. या चोरांच्या मदतीने त्याने एका फायनान्स कंपनीत चोरी करण्याचा कट रचला होता. परंतु, तिथला अलार्म वाजल्याने तो आणि त्याचे साथीदार चोरी करू शकले नाहीत. त्यानंतर या प्रकरणात त्याला निबंबितही करण्यात आलं. परंतु. त्याच्यावरील आरोपपत्र प्रलंबित होतं. त्यानंतर त्याला पुन्हा कामावर रुजू करण्यात आलं आणि देवनहल्ली पोलीस ठाण्यात तैनात करण्यात आलं. दरम्यान, कर्ज फेडण्यासाठी यल्लप्पाने चोरलेले दागिने गहाण ठेवले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.