Bengaluru : भटक्या कुत्र्यांबाबत सध्या मोठी चर्चा सुरू आहे. याचं कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआर भागातील भटक्या कुत्र्यांबद्दल महत्वाचा निर्णय दिला आहे. दिल्ली-एनसीआर भागातील सर्व भटक्या कुत्र्यांना ८ आठवड्यांच्या आत पकडा आणि निवारा केंद्रांमध्ये ठेवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान, देशातील आणखी काही शहरांत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. आता बंगळुरूमधील एका विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये भटक्या कुत्र्यांनी दोन विद्यार्थिनींवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिला आयसीयूत दाखल करण्यात आलेलं आहे. या संदर्भातील वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिलं आहे.
रिपोर्ट्सनुसार, ही घटना सकाळी ११ वाजताच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटीच्या परिसरात घडली. भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात सौजन्या जी.जे. आणि तेलंगणातील रेगा निकृष्टा या दोन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. या दोन्ही विद्यार्थिनी तृतीय वर्षात आहेत. यातील एका विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत.
भटक्या कुत्र्यांना ८ आठवड्यांत पकडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआर भागातील भटक्या कुत्र्यांबद्दल मोठा निर्णय दिला आहे. या भागातील सर्व भटक्या कुत्र्यांना ८ आठवड्यांच्या आत पकडा आणि संबंधित अधिकाऱ्यांनी उभारलेल्या निवारा केंद्रांमध्ये ठेवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये दिल्ली आणि परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या महत्त्वपूर्ण आदेशात नगरपालिका आणि इतर यंत्रणांना निर्धारित वेळेत पुरेशी निवाऱ्याची व्यवस्था उभारण्यासाठी समन्वयाने काम करावे आणि सार्वजनिक ठिकाणांहून भटकी कुत्री हटवली जातील याची खात्री करा, असे निर्देशही देण्यात आले आहेत.