Snake Hidden in Footwear: घराबाहेर ठेवलेल्या क्रॉक्स चपलात लपून बसलेल्या सापाने चावा घेतल्यामुळे बंगळुरूत ४१ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. मंजू प्रकाश असे मृत युवकाचे नाव आहे. ही घटना कर्नाटकची राजधानी असलेल्या बन्नेरघट्टा परिसरात घडली. पोलीस आणि मंजू प्रकाशच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रॉक्स चप्पल घराबाहेर ठेवण्यात आले होते. त्यात सापाने आसरा घेतला होता.
कुटुंबियांनी पुढे सांगितले की, मंजू प्रकाशचा यापूर्वी अपघात झाला होता. या अपघातामुळे त्याच्या तळपायाच्या संवेदना नष्ट झाल्या होत्या. त्यामुळे सापाने चावा घेतल्यानंतर मंजूला त्याची तात्काळ जाणीव झाली नाही. त्यामुळे बाहेरून आल्यानंतर मंजू प्रकाश घरात आराम करत होता. जेव्हा कुटुंबियांना चपलेत साप असल्याचे लक्षात आले तेव्हा त्यांनी सापाला बाहेर काढले. पण सापाचा मृत्यू झाला होता.
यानंतर कुटुंबियांनी मंजू प्रकाशच्या खोलीत धाव घेतली आणि त्याची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र मंजू बेशुद्ध पडला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
मंजू प्रकाश बंगळुरूतील टीसीएस कंपनीत काम करत होता. अपघातामुळे पायातील संवेदना नष्ट झाल्यामुळे त्याचा घात झाला, असे कुटुंबियांनी सांगितले. चपलेत साप असून त्याला चावला असल्याची जाणीवच मंजूला झाली नाही. तसेच कुटुंबियांना जेव्हा चपलेत साप असल्याचे लक्षात आले तेव्हा त्यांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मंजूचा पाय पडल्यामुळे सापाचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर ग्रामीण भागातील घरांना पुन्हा एकदा पावसाळ्यात सतर्क राहण्यास सांगण्यात येत आहे. पावसाळ्यात बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे साप सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याचा प्रयत्न करत असतात. अशावेळी ते चपला, बुट किंवा दुचाकीमध्ये आसरा घेतात. अशावेळी अधिक काळजी घेण्याची गरज आहे, असे पोलिसांनी सांगितले.