Al Qaeda Module in India: गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई केली आहे. गुजरात एटीएसने बंगळुरूमधून ३० वर्षीय शमा परवीन नामक तरूणीला अटक केली. अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंटशी (एक्यूआयएस) जोडल्या गेलेल्या ऑनलाइन दहशतवादी मॉडेलची मुख्य सूत्रधार असल्याचा शमा परवीनवर आरोप आहे. मागच्याच आठवड्यात एक्यूआयएसशी संबंधित चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर ही पाचवी अटक आहे.

शमा परवीन मुळची झारखंडची रहिवासी आहे. गेल्या पाच वर्षांपासून ती बंगळुरूमध्ये राहत होती. २२ जुलै रोजी अहमदाबाद येथून मोहम्मद फरदीन, दिल्लीतून मोहम्मद फैक, नोएडातून झीशान अली आणि गुजरातच्या अरावली जिल्ह्यातील मोडासा येथून सेफुल्ला कुरेशी या चार जणांना अटक करण्यात आली होती. या चौघांवर इन्स्टाग्राम आणि फेसबुकद्वारे AQIS शी संबंधित कट्टरपंथी सामग्रीचा प्रचार केल्याचा आरोप ठेवला गेला आहे.

गुजरात एटीएसचे डीवायएसपी वीरजीतसिंह परमार यांनी केंद्रीय यंत्रणा आणि बंगळुरू पोलिसांच्या मदतीने २९ जुलै रोजी परवीनला अटक केली. यानंतर तिला बंगळुरूच्या ८व्या अतिरिक्त मुख्य महानगर मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. तिथे न्यायाधीशांनी गुजरात पोलिसांना ट्रान्झिंट वॉरंट जारी केला.

गुजरात एटीएसच्या माहितीनुसार, परवीनच्या मोबाइलची प्राथमिक तपासणी केली असता त्यात आक्षेपार्ह सामग्री आढळून आली. सुरक्षा यंत्रणांनी काही इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंटवर संशय घेतला होता, हे अकाऊंट परवीन चालवत असल्याची माहिती समोर आली. तसेच एक्यूआयएसचे नेते मौलाना असीम उमर आणि अन्वर अल-अवलाकी यांची हिंसक जिहादी भाषणे परवीनच्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करण्यात आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शमा परवीनवरील पुढील कायदेशीर कारवाईसाठी तिला ट्राझिंट रिमांडवर अहमदाबादला आणण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, परवीनच्या फोनची तपशीलवार तपासणी केली असता, सोशल मीडिया हँडल्स, ईमेल अकाऊंट्स आणि पाकिस्तानशी संबंधित काही संशयास्पद लिंक्स आढळून आल्या आहेत. केंद्रीय यंत्रणा आणि कर्नाटकमधील पोलीस दल आता शमा परवीनशी संबंधित आणखी काही आरोपी आहेत का? याचा शोध घेत आहे.