जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन वापराच्या सूचीसाठी तांत्रिक सल्लागार गटाला भारत बायोटेक या निर्मात्याकडून कोवॅक्सिन लसीबाबत काही अतिरिक्त स्पष्टीकरणे दिली आहेत. उद्या हा गट अंतिम जोखीम-लाभ मूल्यांकनासाठी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. तांत्रिक सल्लागार गट हा एक स्वतंत्र सल्लागार गट आहे जो जागतिक आरोग्य संघटनेला आपत्कालीन वापरासाठी कोविड-१९ लस सूचीबद्ध करता येईल की नाही याबद्दल शिफारसी प्रदान करतो असे जागतिक आरोग्य संघटनेने अहवालात म्हटले आहे.

या गटाची २६ ऑक्टोबर रोजी बैठक झाली आणि निर्णय घेतला की लसीच्या जागतिक वापरासाठी अंतिम जोखीम-लाभ मूल्यांकन करण्यासाठी लस उत्पादकांकडून अतिरिक्त स्पष्टीकरण आवश्यक आहे.

राष्ट्रीय लस प्रशासन गटाचे अध्यक्ष व्ही.के.पॉल यांनी म्हटले आहे की, जागतिक आरोग्य संघटना लवकरच कोव्हॅक्सिन लशीला मान्यता देईल. भारत बायोटेकने तयार केलेल्या लशीची परिणामकारकता तिसऱ्या टप्प्यात ७७.८ टक्के दिसून आली आहे. कोव्हॅक्सिन व कोव्हिशिल्ड या लशींना भारतात प्रथम परवानगी देण्यात आली होती. जानेवारीपासून भारतात लसीकरण सुरू झाले आहे.

रशियाच्या स्पुटनिक व्ही लशीलाही भारताने मान्यता दिली आहे. कोव्हिशिल्ड ही भारताने तयार केलेली लस आहे. ती सीरम इन्स्टिटय़ूट इंडियाने ऑक्सफर्ड व अ‍ॅस्ट्राझेनेका यांच्याकडून तंत्रज्ञान हस्तांतर करून तयार केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आतापर्यंत फायझर-बायोएनटेक, जॉन्सन अँड जॉन्सन, मॉडर्ना व सिनोफार्म यांच्या लशींना मान्यता दिली आहे.