केंद्राच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या (एसकेएम) ‘भारत बंद’ ला सुरुवात झाली आहे. या बंदला राजकीय पक्षांसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या दरम्यान, शेतकऱ्यांनी विविध महामार्गावरील रस्ते तसेच रेल्वे मार्ग अडवून धरले आहेत. विरोध लक्षात घेऊन दिल्ली वाहतूक पोलिसांनी गाझीपूर सीमेवर वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे, तर शेतकऱ्यांनी पंजाब-हरियाणा दरम्यान शंभू सीमा बंद केली आहे. शेतकरी सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत रस्ते अडवून निषेध करणार आहेत. काँग्रेस, डावे पक्ष, राजद, बसपा आणि सपासह देशातील जवळपास प्रत्येक विरोधी पक्षाने आधीच शेतकरी भारत बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी भारत बंदबाबत माहिती दिली आहे. “रुग्णवाहिका, डॉक्टरांसह सर्व आपत्कालीन सुविधा सुरू राहतील. आम्ही काहीही बंद केले नाही, आम्हाला फक्त एक संदेश पाठवायचा आहे. आम्ही दुकानदारांना आवाहन करतो की त्यांनी दुकाने आत्ता बंद ठेवा आणि संध्याकाळी ४ नंतरच उघडा. एकही शेतकरी बाहेरून येथे आलेला नाही,” असे राकेश टिकैत यांनी म्हटले.

बिहारमध्ये राजद नेते मुकेश रौशन आणि पक्षाचे इतर सदस्य आणि कामगारांनी शेतकरी कायद्यांविरोधात पुकारलेल्या भारत बंदच्या समर्थनार्थ हाजीपूरमध्ये निदर्शने केली. हाजीपूर-मुजफ्फरपूर रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

केंद्राच्या तीन कृषी कायद्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गेल्या वर्षी २७ सप्टेंबरला मंजुरी दिली होती. त्यास एक वर्ष पूर्ण होत असताना हा ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. सकाळी ६ पासून दुपारी ४ वाजेपर्यंत पाळल्या जाणाऱ्या बंददरम्यान देशभरातील सर्व सरकारी व खासगी कार्यालये, शैक्षणिक व इतर संस्था, दुकाने, उद्योग आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद राहतील, तसेच सार्वजनिक कार्यक्रम होणार नाहीत. रुग्णालये, औषधांची दुकाने यांच्यासह सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहील.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharatb band 27th september farmers protest at ghazipur border abn
First published on: 27-09-2021 at 09:01 IST