उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी राम मंदिराला विरोध करणाऱ्या मुस्लिमांबाबत केलेल्या वक्तव्याचा समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले की, मुस्लिमांना देशाबाहेर हाकलायचे असेल तर त्यांना अशा जागी पाठवा जिथे त्यांना कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. राजकीय नेते त्यांना अशा ठिकाणी जाण्यास का सांगतात जिथे आधीच भाकरीची चिंता आहे. त्यापेक्षा देशाच्या राजाने त्यांना युरोपात पाठवायला हवे अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला.

पंतप्रधानांची अमेरिकेच्या हुकुमशाहांचीशी चांगली मैत्री आहे. त्यामुळे मुस्लिमांना अमेरिकतेही पाठवायला काही हरकत नाही. मात्र, त्यासाठी भारतातील सर्वच मुस्लिमांचे तिकडे स्थलांतर व्हायला हवे, अशी टीकात्मक भुमिकाही आझम खान यांनी मांडली आहे.

ज्या मुस्लिमांना अयोध्येतील राम मंदिराला विरोध करायचा आहे त्यांनी थेट पाकिस्तानात निघून जावे असा सल्लाच शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी दिला आहे. त्यांचे हे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशिद यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ८ फेब्रुवारीपासूनच या प्रकरणाची सुनावणीही सुरु होणार आहे. मात्र त्याधीच वसीम रिझवी यांनी ज्यांना मंदिराला विरोध करायचा आहे त्यांनी थेट पाकिस्तानात निघून जावे असे म्हटले होते.

शिया वक्फ बोर्डाचे चेअरमन वसीम रिझवी यांनी अयोध्येत शुक्रवारी नमाज अदा केली. त्याचसोबत त्यांनी आचार्य सत्येंद्र दास यांचीही भेट घेतली. काही लोक बाबरीच्या नावे जिहादला प्रोत्साहन देत आहेत. अशा लोकांनी थेट सीरियात जावे आणि आयसिसशी हातमिळवणी करावी असाही सल्ला त्यांनी दिला. अनेक परंपररावादी मुस्लिम धर्मगुरु देशाचे वाटोळे करण्याचे काम करत आहेत अशा लोकांना अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानात पाठवले पाहिजे असेही रिझवी यांनी म्हटले होते.

राम मंदिरासाठी भारतात वाद होतो आहे ही बाबच दुर्दैवी आहे. राम मंदिराच्या बाबतीत मी माझी कोणतीच बाब मुल्ला-मौलवींच्या समोर ठेवलेली नाही. मी याबाबत सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. सुप्रीम कोर्ट राम मंदिराबाबत जो निर्णय घेईल तो असा असला पाहिजे की त्यामुळे देशाची शांतता टिकून राहिल. राम मंदिराचे म्हणाल त ते खूप आधीच व्हायलाा हवे होते असेही रिझवी यांनी बोलून दाखवले होते.