भीम आर्मीचा संस्थापक चंद्रशेखर उर्फ रावण याची सहारनपूर जेलमधून सुटका करण्यात आली आहे. गतवर्षी जून महिन्यात त्याला अटक करण्यात आली होती. रात्री २ वाजून ४० मिनिटांनी त्याची सुटका करण्यात आली असल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली आहे. सहारनपूरमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारानंतर त्याला अटक करण्यात आली होती. हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला होता तर अनेक जखमी झाले होते. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली होती. नोव्हेंबरमध्ये त्याची सुटका करण्यात येणार होती, मात्र त्याआधीच त्याला सोडून देण्यात आलं आहे.

पोलिसांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखरच्या आईने केलेल्या विनंतीनंतर सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. जेलमधून सुटका होताच चंद्रशेखरने बाहेर जमा झालेल्या समर्थकांसोबत मोर्चा काढला. यावेळी त्याने समर्थकांशी संवाद साधताना भाजपावर हल्लाबोल करत त्यांचा पराभव करण्याचा निर्धार केला. आत्ता तर लढाई सुरु झाली असल्याचंही त्याने यावेळी म्हटलं आहे.

योगी सरकारने चंद्रशेखरची सुटका करण्याचा घेतलेला निर्णय २०१९ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला असल्याचं बोललं जात आहे. दलित आणि भीम आर्मीची नाराजी दूर करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र जेलमधून सुटका होताच चंद्रशेखर याने भाजपावर केलेल्या टीकेमुळे भाजपाची खेळी त्यांच्यावरच उलटू शकते असं दिसत आहे.

भीम आर्मीचा पश्चिम उत्तर प्रदेशात चांगला प्रभाव आहे. भीम आर्मी दलित आंदोलनाच्या सहाय्याने आपले पाय पसरु पाहत आहे. भाजपाच्या नेत्यांनीही कैराना आणि नुरपूर पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवात भीम आर्मी एक महत्त्वाचं कारण असल्याचं मान्य केलं होतं. भीर आर्मी या परिसरांमध्ये दलित आणि मुस्लिमांना एकत्र आणण्यात यशस्वी झाल्याचं भाजपाचं म्हणणं आहे.