आर्थिक मदतीपासून नागरिक वंचित; बेघर होण्याचे संकट

वॉशिंग्टन : लोकांना घरभाडे थकणे व इतर कारणास्तव घराबाहेर काढले जाण्यावर जारी केलेल्या बंदी  हुकमाची मुदत वाढवण्यात बायडेन प्रशासनाला अमेरिकी काँग्रेसमध्ये तूर्त तरी अपयश आल्याचे चित्र आहे. बंदी हुकमाची ही मुदत नुकतीच संपणार असून ती वाढवण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत.

या बंदी  हुकमाला मुदतवाढ मिळाली नाही तर ३६ लाख अमेरिकी लोक घराबाहेर काढले जाण्याचा धोका आहे. कारण करोना काळात दिलेली ४७ अब्ज डॉलर्सची संघराज्य गृहसुविधा मदत लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. करोना काळात आर्थिक परिस्थिती बिकट बनल्याने जे लोक भाडय़ाने व इतर सुविधात राहत होते त्यांना बाहेर काढले जाण्याची शक्यता गृहीत धरून बायडेन प्रशासनाने हा बंदी आदेश जारी केला होता. करोना काळात दिलेली ही मदत घरमालक व घर भाडे देणाऱ्यांपर्यंत पोहोचावी व त्यांनी लोकांना घराबाहेर काढू नये असे यात अपेक्षित होते. पण अजून तरी बंदी हुकमास मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंजूर झालेला नाही. त्यामुळे शुक्रवारी उशिराही अमेरिकी काँग्रेसमध्ये तणाव कायम होता. बंदी आदेश वाढवण्यासंदर्भात यश येत नाही तोपर्यंत कुणालाही घराबाहेर काढण्यात येऊ नये. याबाबतची आर्थिक मदत तातडीने वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे बायडेन यांनी स्थानिक प्रशासनांना सांगितले आहे.

सोमवारपासून लोकांना घराबाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. घरमालकांनी लोकांना घराबाहेर काढू नये यासाठी त्यांना किंवा भाडेक ऱ्यांना दिली जाणारी थेट मदत वितरित करण्यात खरे तर काहीच अडचण येण्याचे कारण नव्हते, असे बायडेन यांनी म्हटले आहे. एकाही व्यक्तीला घराबाहेर काढण्यात येऊ नये यासाठी आमचे स्थानिक प्रशासनाला निधी वितरित करण्याचे आवाहन आहे. बंदी आदेशास मुदतवाढ देण्याबाबत अध्यक्ष व इतरांमध्ये मतभेद झाल्याने वेगळाच पेच निर्माण झाला आहे. त्याचा भाडेकरूंवर व घरमालकांवर परिणाम होणार आहे.

बंदी हुकमाबाबत सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्याऐवजी बायडेन यांनी म्हटले होते, की गुरुवारी हा बंदी आदेश वाढवण्याबाबत त्वरेने कायदा मंजूर करून घेतला जाईल. पण प्रत्यक्षात डेमोक्रॅटिक पक्षाला या कायद्याला संमती मिळवण्यासाठी बहुमत मिळवता आले नाही. औपचारिक मतदानाने हे विधेयक मंजूर करण्याचे प्रयत्नही फसले. सेनेटमध्ये हे विधेयक शनिवारी येणार होते. नवीन विधेयक  रिपब्लिकन पक्षाचे आर्थिक सेवा समिती अध्यक्ष मॅक्सीन वॉटर्स यांनी तयार केले होते. त्यांनी सांगितले, की या विधेयकावर मतदान घेण्यात यावे. सरकार हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे हे तरी स्पष्ट होईल.

फ्लोरिडात करोनाचे २१ हजार नवे रुग्ण

अमेरिकेत करोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले असून फ्लोरिडा राज्यात एकाच दिवसात २१ हजार ६८३ रुग्ण सापडले आहेत. राज्यात एकाच दिवशी एवढे रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.