लष्कराच्या बंडानंतर सुदानची मदत बंद

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की, सुदानला दिली जाणारी सगळी मदत रोखण्यात येत आहे.

वॉिशग्टन : सुदानमध्ये लष्कराने बंड करून सर्व राजकीय नेत्यांना नजरकैदेत टाकल्याने अमेरिका नाराज असून बायडेन प्रशासनाने सुदानची ७०० दशलक्ष डॉलरची मदत बंद केली आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांनी या आफ्रिकी देशातील बंडाचा तीव्र निषेध  केला असून संयुक्त राष्ट्रांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की, सुदानला दिली जाणारी सगळी मदत रोखण्यात येत आहे. कारण त्या देशातील लष्कराने नागरी सरकारला खाली खेचून अधिकार प्रस्थापित केले आहेत. नागरी सरकारच्या अनेक सदस्यांना नजरकैदेत टाकण्यात आले आहे.

परराष्ट्र  प्रवक्ते नेड प्राइस यांनी सांगितले की, ज्यांना अटक करण्यात आली आहे त्यांची सुटका करण्यात यावी. पंतप्रधान अब्दल्ला हामदोक यांच्यासह अनेक नेत्यांना अटक करण्यात आली आहे. सुदानमध्ये ताबडतोब नागरी सरकार प्रस्थापित करण्यात यावे. सुदानी लोकांच्या इच्छेनुसार निवडलेले  सरकार तेथे असावे. सुदानी लोकांनी नागरी सरकारच्या समर्थनार्थ शांततामय निदर्शने केली आहेत. सरकारी अधिकाऱ्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले असून त्यांना सोडून देण्यात यावे. ज्या सरकारी संस्थांचे विसर्जन करण्यात आले आहे त्यांचे पुनरुज्जीवन करण्यात यावे असे अमेरिकेचे मत आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांची सुटका करावी तसेच नागरी सरकार पुन्हा प्रस्थापित करण्यात यावे. नागरी सरकारला विरोध होणार असेल तर सुदानची मदत बंदच राहील व द्विपक्षीय संबंधांवर त्याचा परिणाम होईल असे अमेरिकेने म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत चर्चा

कैरो : सुदानमध्ये लष्कराने बंड केल्यानंतर तणावपूर्ण शांतता असून लोकशाहीवादी निदर्शकांनी सुदानच्या राजधानीतील रस्ते अडवले आहेत. लष्कराने बंड केल्यानंतर मंगळवारी आंतरराष्ट्रीय समुदायाने या घटनेचा निषेध केला आहे.  गेल्या दोन वर्षांपासून सुदानमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्याची प्रक्रिया सुरू असताना लष्कराने बंड केले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात या प्रकरणी मंगळवारी चर्चा झाली. पाश्चिमात्य देशांनी लष्कराच्या बंडाचा निषेध केला असून पंतप्रधान अब्दल्ला हामडोक व इतर अधिकाऱ्यांची सुटका करण्याची मागणी केली आहे. शनिवारी निदर्शकांनी लोकशाही सत्तेच्या मागणीसाठी निदर्शने केली होती. त्यानंतर सोमवारी लष्कराने सत्ता ताब्यात घेतली. यापूर्वीही लष्कराने दोन वर्षांपूर्वी बंड केले होते.  त्या वेळी ओमर अल बशीर यांची सत्ता उलथवण्यात आली होती. आताच्या बंडावेळी निदर्शक खार्टूमच्या रस्त्यावर आले असून सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात चार निदर्शक ठार झाले आहेत, असे सुदान डॉक्टर्स समितीने म्हटले आहे.  जनरल अब्देल फताह बुरहान यांनी हामदोक सरकार बरखास्त केले असून सार्वभौम मंडळ, संयुक्त लष्करी व नागरी मंडळ यांची स्थापना करण्यात आली आहे. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Biden administration halts aid to sudan after military coup zws