बिहारमधील वैशाली जिल्ह्यात शनिवारी गंगा नदीत जवळपास १२५-१५० लोकांना घेऊन जात असलेली एक बोट अति उच्चदाब असलेल्या वीज तारांच्या संपर्कात आली, ज्यामुळे घडलेल्या दुर्घटनेत जवळपास ३ डझन पेक्षाही जास्त जण जखमी झाले आहेत. तर जवळपास १५-२० नागरिक अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती समोर आी आहे.

ही बोट शनिवारी रात्री जवळपास ८ वाजता ग्रामीण पटणामधील फतुहा येथील कच्छी दर्गा घाटावरून वैशालीच्या राघोपुर नदी क्षेत्राकडे रवाना झाली होती. यामधील बहुतांश प्रवासी हे कामगार होते जे सकाळी मोकामा आणि पटणा येथे आले होते आणि येथून ते घरी परतत होते.

जेव्ही ही बोट नदीच्या मध्यात आली, तेव्हा ती हायटेंशन वीज तारेच्या संपर्कात आली आणि उलटली. या दुर्घटनेत जवळपास तीन डझनहून अधिक जण जखमी झाले तर अनेकजण नदीत बुडाले असून अद्यापही ते बेपत्ता आहेत.

पाटणामध्ये गेल्या काही दिवसांपासून गंगा नदी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहे. ग्रामीण पाटणाच्या नऊ ब्लॉकमधील एकूण २.७४ लाख लोक प्रभावित झाले आहेत.

“मी पाटण्यातील माझ्या कामानंतर घरी परतत होतो. बोट रात्री ८ वाजता पाटणा येथून निघाली आणि सुमारे अर्ध्या तासानंतर ती हायटेंशन वायरच्या संपर्कात आली. नदीत पाण्याचा प्रवाह खूप जास्त होता त्यामुळे ही घटना घडली” असं रोजंदारीवर काम करणारा आणि या बोटीद्वारे राघोपूरला परतणाऱ्या रुदल दासने सांगितले आहे.