Bihar Election Results 2025 all Party Vote Share : बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) मोठा विजय मिळवला आहे. एनडीएने २०२ जागा जिंकल्या असून विरोधकांच्या महाआघाडीला अवघ्या ३५ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ८९ तर, जनता दलाने (संयुक्त) ८५ जागा जिंकल्या आहेत. लोक जनशक्ती पार्टीचे १९ उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रीय लोक मोर्चाला देखील चार जागांवर विजय मिळाला आहे. या पक्षांच्या ताकदीच्या जोरावर एनडीएने द्विशतक पूर्ण केलं आहे.
दुसऱ्या बाजूला, महाआघाडीमधील पक्षांना ४० जागा देखील जिंकता आलेल्या नाहीत. राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार २५ जागांवर विजयी झाले आहेत. काँग्रेसला एकेरी जागांवर समाधान मानावं लागलं आहे. कारण काँग्रेसचे केवळ सहा उमेदवार निवडून आले आहेत.
राजद सर्वात मोठा पक्ष
बिहारमध्ये भाजपा व जदयू हे सर्वात मोठे पक्ष ठरले असले तरी मतांच्या बाबतीत हे पक्ष सर्वात पुढे नाहीत. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला सर्वाधिक मतं मिळाली आहेत. मात्र, सर्वाधिक मतं मिळूनही या पक्षाला केवळ २५ जागा जिंकता आल्या आहेत. त्यामुळे तेजस्वी यादव यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगलं आहे.
लोजपाची मुसंडी
या निवडणुकीतील खास बाब म्हणजे राजदला सर्वाधिक २३ टक्के मतं मिळाली असून केवळ २५ जागा जिंकता आल्या आहेत. तर, चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीने (रामविलास) केवळ ४.९७ टक्के मतं मिळवली आहेत. या पाच टक्के मतांच्या जोरावर लोजपाने १९ जागा जिंकल्या आहेत.
| . | पक्ष | एकूण मतं | मतांची टक्केवारी |
| १ | राष्ट्रीय जनता दल | ११,५४६,०५५ | २३ टक्के |
| २ | भारतीय जनता पार्टी | १०,०८१,१४३ | २०.८ टक्के |
| ३ | जनता दल (संयुक्त)९६६७११८ | १९.२५ टक्के | |
| ४ | काँग्रेस | ४३,७४,५७९ | ८.७१ टक्के |
| ५ | लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) | २४,९७,३६८ | ४.९७ टक्के |
| ६ | कम्युनिस्ट पार्टी (मार्क्स व लेनिनवादी) | १४,२५,५९२ | २.८४ टक्के |
| ७ | एमआयएम | ९,३०,५०४ | १.८५ टक्के |
| ८ | नोटा | ९,१०,७३० | १.८१ टक्के |
| ९ | बसपा | ८,१३,५८३ | १.६२ टक्के |
एनडीएच्या जमेच्या बाजू
ऐन मतदानाच्या तोंडावर बिहारमधील १.२ कोटी महिलांना देण्यात आलेली प्रत्येकी १० हजार रुपयांची रोजगाराभिमुख मदत, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मागे भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उभी केलेली संघटित ताकद, विस्कळीत विरोधी आघाडी, राष्ट्रीय जनता दलाचे मुस्लीम-यादव मतपेढीचे फसलेले गणित या घटकांमुळे बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप-संयुक्त जनता दलप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) अभूतपूर्व विजय मिळवला.
