बिहारचे मुख्यमंत्री जितन राम मांझी येत्या २० फेब्रुवारी रोजी विश्वासदर्शक ठराव मांडणार असून त्या वेळी कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी जद(यू), भाजप आणि राजदने स्वपक्षीय आमदारांसाठी प्रीतिभोजन आयोजित करून सर्वाना एकत्रित ठेवण्यासाठी पावले उचलली आहेत.
जद(यू)चे आमदार विनोद सिंह यांनी मंगळवारी रात्री माजी मंत्री गौतम सिंह यांच्या निवासस्थानी प्रीतिभोजन आयोजित करून त्याची सुरुवात केली. सदर दोन्ही नेते जद(यू)चे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांचे समर्थक आहेत.
या प्रीतिभोजनाला नितीशकुमार यांच्यासह राजद, काँग्रेस आणि भाकपच्या ज्येष्ठ नेत्यांनी हजेरी लावल्याने या पक्षांचा नितीशकुमार यांना पाठिंबा असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. प्रीतिभोजनाची ही मालिका बुधवारीही सुरू होती. राजद विधिमंडळ पक्षाचे नेते अब्दुल बारी सिद्दिकी यांनी भोजनाचे आयोजन केले होते.