बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लगबगीनं स्वेच्छानिवृत्ती घेत जदयूमध्ये प्रवेश करणारे बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांची निराशा झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी जदयू व भाजपाकडून जाहीर करण्यात आली. यात ज्या बक्सर विधानसभा मतदारसंघातून पांडे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. जदयूनं जाहीर केलेल्या यादीत पांडे यांचं नाव नव्हते. त्यामुळे भाजपाकडून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा होती. मात्र, भाजपानं दुसराच उमेदवार घोषित केल्यानं पांडे यांची निराशा झाली आहे. उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर पांडे यांनी आपली भूमिका मांडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणामुळे चर्चेत आलेले बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना जनता दल (संयुक्त) व भाजपा या दोन्ही पक्षांनी निवडणुकीपासून दूर ठेवलं आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेले पांडे बिहार विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आधीपासूनच सुरू झाल्या होत्या. निवडणूक जवळ आल्यानंतर पांडे यांनी अचानक स्वेच्छानिवृत्ती घेत जदयूमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांना जदयूकडून तिकीट मिळण्याची शक्यता होती.

गुप्तेश्वर पांडे बक्सर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, एनडीएच्या जागावाटपात बक्सर मतदारसंघ भाजपाकडे गेला. त्यात जदयूनं जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत पांडे यांचा पत्ता कापण्यात आल्याचं समोर आलं. पण भाजपाकडून त्यांच्या नावाची घोषणा होण्याची चर्चा सुरू होती. मात्र, भाजपानं बक्सरमधून परशुराम चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून पांडे यांच्या पदरी निराशाच पडली आहे.

बक्सरमधून भाजपानं उमेदवार जाहीर केल्यानंतर गुप्तेश्वर पांडे यांनी भूमिका मांडली. “माझ्या शुभचिंतकांच्या फोनमुळे त्रस्त झालो आहे. मी त्यांची चिंता आणि समस्या समजू शकतो. सेवेतून निवृत्त झाल्यानंतर सगळ्यांना अपेक्षा होती की, मी निवडणूक लढवेल. पण यावेळी विधानसभा निवडणूक लढवणार नाही. हताश आणि नाराज होण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही. संयम ठेवा. माझं जीवन संघर्षातच गेलं आहे. मी आयुष्यभर जनतेची सेवा करत राहिल. संयम ठेवावा व मला फोन करू नये. माझं जीवन बिहारच्या जनतेला समर्पित आहे,” असं सांगत पांडे यांनी मनातील खंत बोलून दाखवली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar election bihar assembly election 2020 gupteshwar pandey candidate list bjp jdu bmh
First published on: 08-10-2020 at 07:54 IST