निवडणुका जाहीर झाल्यानंतरही जागावाटपावरून भाजपच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सुरू असलेले चर्चेचे गु-हाळ सोमवारी अखेर संपुष्टात आले. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन आघाडीतील जागावाटप जाहीर केले.
बिहार विधानसभेतील एकूण २४३ जागांपैकी सर्वाधिक १६० जागांवर भाजप निवडणूक लढविणार असून, त्या खालोखाल ४० जागा रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला देण्यात आल्या आहेत. उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोकसमता पक्षाला २३ जागा देण्यात आल्या असून, बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्या आवामी मोर्चाची अवघ्या २० जागांवर बोळवण करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मांझी यांना अधिक जागांची अपेक्षा होती. मात्र, सहयोगी पक्षांकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. याच मुद्द्यावरून जागावाटपाचा तिढा निर्माण झाला होता. मांझी यांचे काही उमेदवार भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविणार आहेत, असे अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हे उमेदवार कोण असतील, याचा निर्णय मांझीच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसून, मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय निवडणुकीच्या निकालांनंतर आघाडीच्या आमदारांच्या बैठकीमध्ये घेतला जाईल, असेही अमित शहा यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar election bjp finalises seat sharing deal with allies
First published on: 14-09-2015 at 14:48 IST