बिहार आणि नेपाळ सीमेवरील कोसी नदीस आलेल्या महापूराचा धोका लक्षात घेत तेथील रहिवाशांना सक्तीने अन्यत्र हलविण्याचे आदेश बिहार सरकारने दिले आहेत. बिहार राज्यातील नऊ जिल्ह्य़ांमधून कोसी नदीचा प्रवाह जातो. या सर्व जिल्ह्य़ातील नदी पात्रानजीक असणाऱ्या लोकांना स्थलांतरीत करण्यात येणार आहे.
नेपाळमध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मदतकार्यात येणाऱ्या अडचणींमुळे घटनास्थळी तेथील सैन्याने कमी तीव्रतेचे दोन स्फोट घडवून आणले आणि त्यामुळे कोसीच्या पात्रातील जलपातळीत तब्बल सव्वा लाख क्युसेक्स पाणी वाढले. यानंतर बिहार सरकारने सक्तीच्या स्थलांतराचा निर्णय घेतला.
आतापर्यंत १६,८०० जणांची सुटका करण्यात यश आले असून अद्याप ६० हजार जण अडकून पडले आहेत, अशी माहिती बिहार सरकारने दिली. तसेच कोसी नदीच्या पात्रात सुमारे सव्वा चार लाख लोक वस्तीस असून त्या सगळ्यांनाच या महापूराचा फटका बसेल, अशी भीती सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. राज्य सरकारतर्फे १२० मदत छावण्या उभारण्यात आल्या असून जनावरांसाठीही १७ मदत छावण्या तैनात करण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा संपूर्ण क्षमतेने काम करत असून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या १५ तुकडय़ा, लष्कराच्या ४ तुकडय़ा तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या काही तुकडय़ा अहोरात्र मदतकार्य करत असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती बिहारमधील अधिकाऱ्यांनी दिली. लष्कर आणि निमलष्करी दलाची १७ हेलिकॉप्टरही मदतीसाठी सज्ज आहेत.

शुक्रवारची दुर्घटना
नेपाळ हद्दीतील पर्वतीय भागात दरड कोसळल्यामुळे कोसी नदीचीच उपनदी असलेल्या भोते कोसी नदीत प्रचंड चिखल तयार झाला आणि तब्बल २५ लाख क्युसेक्स इतके पाणी तेथे साचले. त्यामुळे नदीला पूर आला.

केंद्राची सर्वतोपरी मदत
कोसी नदीला आलेल्या भीषण पूरानंतर केंद्राने सर्वतोपरी मदत सुरू केली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू करण्यात आला असून मदतीसाठी अनेक मालवाहतूक विमाने सज्ज ठेवण्यात आली आहेत. आपत्ती निवारण दलाच्या अनेक तुकडय़ाही बिहारमध्ये पाठविण्यात आल्या आहेत.

नेपाळमध्ये २०० जण बेपत्ता
शुक्रवारी टेकडी कोसळून झालेल्या अपघातात ईशान्य नेपाळमधील अनेक गावांमध्ये महापुराची भीती व्यक्त केली जात आहे. येथे सर्वत्र दलदल आणि चिखलाचे साम्राज्य पसरले असून २०० जण बेपत्ता आहेत. एक मोठ्ठी टेकडीच कोसळ्यामुळे जवळजवळ १०० घरे गाडली गेली आहेत. तसेच कोसी नदीच्या पात्रास यामुळे अवरोध निर्माण झाला असून अडीच किमी लांब आणि १३० मीटर खोलीचा तलावच तयार झाला आहे. या दुर्घटनेत किमान ८ जण ठार झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मातीचे ढिगारे हलविण्यासाठी नेपाळी लष्करातर्फे दोन कमी तीव्रतेचे स्फोट घडविण्यात आले असून त्यामुळे बिहारमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.