बिहारमधील मोकामा मतदारसंघाचे अपक्ष आमदार अनंत कुमार सिंह यांना तेथील एका स्थानिक न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. १६ ऑगस्ट रोजी अनंत सिंह यांच्या घरी मारण्यात आलेल्या छाप्या दरम्यान एक एके-47 रायफल, दोन ग्रेनेड आणि काही काडतूसं सापडली होती.

यानंतर १७ ऑगस्ट रोजी अनंत कुमार सिंह यांना अटक करण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी गेले होते, मात्र ते फरार झाले होते. सहा दिवस फरार असल्याच्या कालावधीत अनंत कुमार सिंह यांनी तीन व्हिडिओ शेअर केले होते. ज्यामध्ये न्यायालयात आत्मसमर्पण करण्याबाबत सांगितले होते. त्यानुसार २३ ऑगस्ट रोजी त्यांनी दिल्लीतील साकेत न्यायालयात आत्मसमर्पण केले होते.

अनंत कुमार सिंह यांना जून २०१५ मध्ये एका हत्याकांडाच्या प्रकरणातही अटक करण्यात आली होती. त्यांचे बिहारच्या बाहूबली नेत्यांमध्ये नाव घेतले जाते व छोटे सरकार असे संबोधल्या जाते. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जवळचे मानले जाणारे अनंत कुमार सिंह हे २००५ मध्ये पहिल्यांदा जदयूच्या तिकीटावर निवडणुक जिंकले होते.