बिहारमध्ये एका मंत्र्याच्या मुलाने दादागिरी केल्याचा प्रकार समोर आलाय. बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील नौतनचे भाजपा आमदार आणि बिहार सरकारचे पर्यटन मंत्री नारायण प्रसाद यांचा मुलगा बबलू यांने दादागिरी करत बागेत क्रिकेट खेळणाऱ्या मुलांमध्ये झालेल्या भांडणानंतर गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्री नारायण प्रसाद यांच्या मुलाने धमकावत हवेत गोळीबार केला आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. यामध्ये एका लहान मुलासह अनेक जण जखमी झाले आहेत.

बबलू मंत्री असलेल्या वडिलांच्या शासकीय वाहनातून घटनास्थळी आला होता. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, मंत्र्यांचा मुलगा आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांनी मुलांना मारहाण करत गोळीबार केला. मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी मंत्र्यांचे बसलेले वाहन ताब्यात घेतले. मंत्र्यांचा मुलगा आणि इतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले नसते तर परिस्थिती आणखी बिघडू शकते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. लोकांनी मंत्र्यांच्या वाहनावरील नेम प्लेट तोडून त्यांच्या वाहनाला घेराव घालून जोरदार निदर्शने केली.

घटना बेतिया येथील हरदिया फुलवारी गावातील आहे. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास पर्यटनमंत्री नारायण प्रसाद यांच्या कुटुंबीयांमध्ये आणि त्यांच्या बागेत क्रिकेट खेळणाऱ्या मुलांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर हाणामारी झाली. गावातील बागेत मुले खेळत होती, असे सांगितले जाते. अचानक तीन वाहनांमध्ये लोक तेथे पोहोचले. त्यापैकी एकावर पर्यटन मंत्र्यांच्या नावाचा फलक होता. वाहनातून आलेल्या लोकांनी मुलांना मारहाण केली. तसेच त्यांनी गोळीबार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मंत्र्यांचा मुलगा आणि त्याच्या साथीदारांचा पाठलाग सुरू केला. त्यांचा राग पाहून मंत्र्याचा मुलगा नीरज कुमार उर्फ ​​बबलू प्रसादला परवाना असलेली रायफल, पिस्तुल घेऊन आणि गाडी सोडून पळून गेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्री नारायण प्रसाद कठैया हे विष्णुपुरवा येथील रहिवासी आहेत. त्यांची हरदिया फुलवारी येथे बाग आहे. दरम्यान, गोळीबार झाल्याची माहिती मंत्र्यांनी नाकारली आहे. त्यांनी सांगितले की, मुलगा त्यांची गाडी घेऊन गेला नव्हता. या प्रकरणबद्दल अधिक माहिती मिळवत असल्याचे त्यांनी सांगितले.