पाटणा : बिहारमध्ये २० नोव्हेंबरला नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शख्यता आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी सोमवारी दिली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय लोकशाहीचे वरिष्ठ नेते आणि अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. त्यापूर्वी १९ नोव्हेंबरला नितीश कुमार राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याकडे मंत्रिमंडळाचा राजीनामा सोपवतील.
तत्पूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांना सांगितले की, “नवनिर्वाचित आमदारांची मंगळवारी बैठक होईल, त्यामध्ये विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल. नवीन सरकारचा शपथविधी २० किंवा २१ नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे.” शपथविधी सोहळ्यासाठी पाटण्याच्या गांधी मैदानावर तयारी सुरू आहे.
दरम्यान, बिहारच्या मंत्रिमंडळाची सोमवारी अखेरची बैठक झाली, त्यामध्ये विधानसभा बरखास्त करण्याची राज्यपालांना शिफारस करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आले, अशी माहिती विधिमंडळ कामकाज मंत्री विजय चौधरी यांनी दिली. या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि मुख्य सचिव प्रत्यय अमृत त्यांच्याबरोबर होते.
