scorecardresearch

कारने १२ किमी फरफटत नेल्याने दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू; दिल्लीजवळील घटनेच्या चौकशीचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे आदेश

पीटीआय, नवी दिल्ली कारच्या धडकेत मृत्यू झाल्यानंतर दुचाकीस्वार २० वर्षीय तरुणीला कारचालकाने १२ किलोमीटपर्यंत फरफटत नेल्याची मन विषण्ण करणारी घटना दिल्लीजवळ रविवारी पहाटे घडली.

कारने १२ किमी फरफटत नेल्याने दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू; दिल्लीजवळील घटनेच्या चौकशीचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे आदेश
प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

पीटीआय, नवी दिल्ली
कारच्या धडकेत मृत्यू झाल्यानंतर दुचाकीस्वार २० वर्षीय तरुणीला कारचालकाने १२ किलोमीटपर्यंत फरफटत नेल्याची मन विषण्ण करणारी घटना दिल्लीजवळ रविवारी पहाटे घडली. याप्रकरणी पाच आरोपींना सोमवारी अटक करण्यात आली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

एका कारने दुजाकीस्वार तरुणीला धडक दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला. त्यानंतरही कार न थांबवता चालकाने मृत तरुणीला सुलतानपूरी ते कांझावालापर्यंत फरफटत नेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या तरुणीचे शवविच्छेदन करण्यासाठी वैद्यकीय पथकाची स्थापना करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पाचही आरोपींवर आणखी गुन्हे दाखल केले जातील, असे विशेष पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सागर प्रीत हुड्डा यांनी सांगितले. दरम्यान, आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल न करला निष्काळजीपणा आणि गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना घटनास्थळी नेण्यात येणार असून सीसीटीव्ही चित्रण आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे गुन्हे दाखल केले जातील. तसेच वाहनाची जैवविज्ञान चाचणी केली जाईल, असे हुड्डा यांनी सांगितले.

दरम्यान, या तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. परंतु पोलिसांनी हा अपघात असल्याचे म्हटले आहे. पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी स्थानिक रहिवाशांनी सुलतानपुरी पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने केली आणि वाहतूक रोखून धरली. पोलीस या घटनेकडे अपघात म्हणून पाहात असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

दरम्यान, हा दुर्मिळातीलदुर्मीळ गुन्हा असून आरोपी प्रभावशाली कुटुंबातील असले तरी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली जावी, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी व्यक्त केली. तसेच या घटनेप्रकरणी दिल्ली महिला आयोगाने दिल्ली शहर पोलिसांना नोटीस बजावली आहे.

कुटुंब निराधार..
कारने फरफटत नेल्याने मृत्यू झालेली ही तरुणी तिच्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती होती. तिची आई सध्या डायलिसीसवर आहे. दोन बहिणी-दोन भावांचे पालनपोषण ती करीत होती. गेल्यावर्षी तिच्या वडिलांचे निधन झाल्यापासून ती घर चालवत होती. एका कंपनीत रात्री उशिरापर्यंत अर्धवेळ नोकरी करून ती कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होती. तिच्या मृत्युमुळे तिच्या कुटुंबाचा आधार तुटला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 03:23 IST

संबंधित बातम्या