Bilawal Bhutto छ पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपुल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो जरदारी यांनी भारताला युद्धाची धमकी दिली आहे. भारताने सिंधु करार स्थगितच ठेवला आणि सिंधु नदीवर भिंत डॅम उभारण्याचा प्रयत्न केला तर युद्ध अटळ असेल. बिलावल भुट्टो यांनी हजरत शाह अब्दुल लतीफ यांच्या नावे जो पुरस्कार दिला जातो त्या सोहळ्यात बिलावल भुट्टोंनी भारताला धमकी दिली आहे. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावलं उचलली होती. सिंधु जल कराराला स्थगिती देणं हेदेखील एक महत्त्वाचं पाऊल होतं. ज्यानंतर पाकिस्तान खवळला आहे.

बिलावल भुट्टोंनी भारताविरोधात काय गरळ ओकली?

भारताने सिंधु करार स्थगित ठेवला आणि सिंधु नदीवर बांध बांधण्याची तयारी सुरु केली तर युद्ध होणारच. पाकिस्तानने अद्याप युद्धाला सुरुवात केलेली नाही. आम्हाला शांतताच हव आहे. पण जर भारताने कुरापत काढली तर प्रत्येक पाकिस्तानी नागरिक आणि पाकिस्तानी सैन्य त्यांना उत्तर द्यायला तयार आहे. असीम मुनीर यांनी भारताला अणु हल्ला करु असा इशारा दिला होता. त्याला २४ तास उलटत नाहीत तोच बिलावल भुट्टोने युद्धाची धमकी भारताला दिली आहे.

भारताने जी कठोर पावलं उचलली त्यामुळे पाकिस्तान खवळला

एप्रिल महिन्यात पहलगामचा दहशतवादी हल्ला झाला. त्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा सहभाग होता. यानंतर भारताने कठोर पावलं उचलली आणि सिंधु कराराला स्थगिती दिली. दरम्यान ७ मे च्या रात्री भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधले नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरु झाला होता. मात्र १० मेच्या दिवशी पाकिस्तानने भारतासमोर गुडघे टेकले. ज्यानंतर दोन्ही देशांमध्ये शस्त्रविराम झाला होता. आता पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताला युद्धाची धमकी दिली आहे.

पाकिस्तानच्या या इशाऱ्यावर आता भारत काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानला देण्यात आलेलं चोख उत्तर होतं. त्यानंतर त्यांनीही भारतावर ड्रोन हल्ले आणि हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सैन्य दलांनी त्यांचे हल्ले आणि त्यांचे मनसुबे दोन्ही उधळून लावलं. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने कंबर कसली होती. मात्र १० मे रोजी पाकिस्तानने विनंती केल्यानंतर भारताने शस्त्रविराम केला. यानंतर आता लागोपाठ दोन दिवस पाकिस्तानले दोन नेते भारताविरोधात गरळ ओकत आहेत. त्यांना काय उत्तर दिलं जाणार? हे पाहणं महत्त्वाचं असेल.