Robbery at retired judge’s house: मध्य प्रदेशच्या इंदूर येथे निवृत्त न्यायाधीशाच्या घरात जबरी चोरी करण्यात आली आहे. मास्क घातलेल्या तीन चोरांनी मध्यरात्री घरात घुसून पाच लाख रुपयांची रोकड आणि दागिने लुटले. चोरी करत असताना अलार्म सिस्टिमचा गजर वाजूनही घरातील सदस्य जागा झाला नाही. मात्र हा सदस्य जागा झाला असता तर चोरांकडे वेगळी योजनाही होती. एक चोर हातात रॉड घेऊन तयारच होता. जर घरातला सदस्य उठला असता तर त्याच्यावर जीवघेणा हल्ला होऊ शकला असता. मात्र सुदैवाने तो बचावला.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, रविवारी १० ऑगस्ट रोजी पहाटे ३.३० वाजता इंदूरच्या विजय नगर येथील निवृत्त न्यायाधीश रमेश गर्ग यांच्या निवासस्थानी दरोडा पडला. चार मिनिटे, दहा सेकंदात दरोडेखोरांनी घरातील ऐवज लंपास केला. न्या. गर्ग यांचे कुटुंब गाढ झोपेत असताना चोरट्यांनी मुख्य गेटचे कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश केला आणि कपाट उघडून चोरी केली.

अलर्ट सिस्टिम वाजूनही चोर पळून जाण्यात यशस्वी

या चोरीचे सीसीटीव्ही चित्रण आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. न्या. गर्ग यांचा मुलगा ऋत्विक गाढ झोपेत असताना चोर त्याच्या बेडरूममध्ये शिरले. त्यांनी कपाट उघडल्यानंतर घरात असलेल्या अलर्ट सिस्टिमचा गजर वाजला. गजर वाजल्यानंतर एक चोर हातात रॉड घेऊन ऋत्विक यांच्या समोरच उभा होता. ऋत्विक झोपेतून उठला असता तर कदाचित त्याच्यावर हल्ला झाला असता.

मात्र ऋत्विक यांना जाग न आल्यामुळे चोर चोरी करून पळून जाण्यात यशस्वी ठरले. आता ऋत्विक खरोखरच गाढ झोपला होता की तो झोपेचे सोंग करत होता, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

विशेष म्हणजे बंगल्याबाहेर सुरक्षा रक्षक तैनात असतानाही चोरांनी लोखंडी गेटचे ग्रिल तोडून आत प्रवेश केला, असे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान ऋत्विक यांची पत्नी आणि मुले दुसऱ्या खोलीत झोपलेले होते. त्यांना घरात चोरी झाल्याची कल्पनाही नव्हती.

विजय नगर पोलिसांनी सदर चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.