देशाची राजधानी दिल्लीतील जंतर – मंतर येथे ८ ऑगस्ट रोजी निदर्शनादरम्यान केलेल्या प्रक्षोभक घोषणाबाजीचा मुद्दा आता गंभीर बनला आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आज (मंगळवार) दिल्ली पोलिसांनी भाजपा नेते अश्विनी उपाध्याय यांच्या सह ६ जणांना अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अश्विनी उपाध्याय व्यतिरिक्त विनोद शर्मा, दीपक सिंग, दीपक, विनीत क्रांती, प्रीत सिंह यांनाही अटक करण्यात आली आहे. प्रीत सिंह हे सेव्ह इंडिया फाउंडेशनचे संचालक आहेत, ज्यांच्या बॅनरखाली ८ ऑगस्ट रोजी जंतर -मंतर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिल्ली पोलीस मंगळवारी सकाळपासून या सर्वांची चौकशी करत आहेत, तर गुन्हे शाखाही या प्रकरणात सक्रिय आहे. घोषणा देणाऱ्या पिंकी चौधरीचा दिल्ली पोलीस अजूनही शोध घेत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ अ आणि १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

दिल्लीच्या जंतर -मंतरवर आंदोलनादरम्यान लोकांनी जातीय घोषणाबाजी केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात आला होता, त्यानंतर दिल्ली पोलिसांनी सोमवारी या संदर्भात गुन्हा दाखल केला. भारत जोडो आंदोलनाच्या वतीने जंतर -मंतरवर निदर्शने करण्यात आली होती.

भारत जोडो आंदोलनाचे मीडिया प्रभारी शिप्रा श्रीवास्तव यांनी सांगितले की, आंदोलनाचे नेतृत्व भाजपाचे माजी प्रवक्ते अश्विनी उपाध्याय यांनी केले. मात्र, त्यांनी जातीय घोषणा देणाऱ्यांशी कोणताही संबंध नाकारला आहे.

हेही वाचा – दिल्ली : ‘जंतरमंतर’वरील आंदोलनात प्रक्षोभक घोषणाबाजी केल्याने दिल्ली पोलिसांकडून FIR दाखल!

व्हिडिओची सत्यता तपासली पाहिजे

अश्विनी उपाध्याय म्हणाले की, “व्हिडिओची सत्यता तपासली पाहिजे, जर ती खरी असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. जर व्हिडीओ बनावट असेल तर कारवाई करावी. आमचा दोष एवढाच आहे की, आम्ही भारत छोडो दिन साजरा करण्यासाठी, इंग्रजी कायद्यावर आक्षेप घेण्यासाठी गेलो होतो.”

अश्विनी उपाध्याय यांनी सांगितले की, त्यांनी व्हिडिओ अनेकवेळा पाहिला आहे. पण त्या घोषणा देणाऱ्यांचा शोध लागला नाही. पोलिसांनी याची चौकशी करून त्यावर कारवाई करावी. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की अजून अटक होणार नाही, चौकशी केली तर आम्ही तपासात पूर्ण सहकार्य करू. माझी प्रकृती ठीक नाही, तरी देखील पोलिसांच्या सांगण्यावरून मी पोहोचलो आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp ashwini upadhyay among 6 arrested by delhi police srk
First published on: 10-08-2021 at 11:50 IST