अमित शहा यांचे स्पष्टीकरण; भाजप कार्यकारिणीची बैठक
भाजप, व्यक्ती अथवा सरकारवर करण्यात आलेली कोणत्याही प्रकारची टीका स्वीकारार्ह आहे, मात्र देशाविरुद्धची टीका कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, विचारस्वातंत्र्याच्या नावाखाली देशविरोधी घोषणा देण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणाले. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला शनिवारी येथे सुरुवात झाली त्या वेळी उद्घाटनपर भाषण करताना शहा बोलत होते.
या वेळी शहा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची कामगिरी कशी होणार नाही हा काँग्रेसचा मुख्य हेतू आहे, मात्र सरकारने भ्रष्टाचारमुक्त कारभार करून, घराणेशाहीमुक्त नेतृत्व देऊन जनतेत स्थैर्य आणि आशा निर्माण केली आहे, असेही ते म्हणाले.
विचारस्वातंत्र्याबाबत काँग्रेस आणि डाव्यांनी केलेल्या टीकेवर हल्ला चढविताना शहा म्हणाले की, माओवाद आणि स्टालिन यांचे समर्थक याबाबत भाष्य करीत आहेत. प्रमुख विरोधी पक्षाला लक्ष्य करण्यासाठी आणीबाणीच्या काळात झालेल्या अत्याचारांचा शहा यांनी पुनरुच्चार केला.
शहा यांच्या भाषणांनंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी वार्ताहरांना सांगितले की, शहा यांनी सरकारने हाती घेतलेल्या अनेक जनताभिमुख योजनांवरही सविस्तर भाष्य केले. अर्थसंकल्पावर त्यांनी प्रकाशझोत टाकला आणि तेच राष्ट्रीय राजकारणाला कलाटणी देणारे असल्याचा दावा केला.
तथापि, देशभक्ती हाच त्यांच्या भाषणाचा मुख्य मुद्दा होता आणि त्यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जेएनयूमधील देशविरोधी घोषणांचे समर्थन केल्याबद्दल गांधी यांच्यावर टीका केली.