भाजपचा सवाल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताला जेव्हा वेदना होतात तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना आनंद का होतो, असा सवाल भाजपने गुरुवारी केला. मसूद अझरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावात चीनने खोडा घातल्यानंतर राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली होती. त्यानंतर भाजपने वरील सवाल केला.

चीनच्या अशा वागणुकीमुळे भारताला वेदना होत असताना राहुल गांधी यांना आनंद का होतो, असा सवाल केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला. आपले ट्वीट जैशच्या अड्डय़ावर आनंदाने जाईल, मात्र दहशतवादाविरुद्ध लढण्याबाबत काँग्रेसची बांधिलकी आहे का, असे आपल्याला वेदनेने विचारावे लागत आहे, असे रविशंकर प्रसाद एका पत्रकार परिषदेत म्हणाले.

राहुल यांच्या ट्वीटची पाकिस्तानमध्ये मोठी बातमी झाली, पाकिस्तानमध्ये आपल्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले त्याने आपल्याला आनंद झाला असेल, असेही प्रसाद म्हणाले. राहुल यांचे चीनसोबत चांगले संबंध असतील तर त्याचा भारताला लाभ का होत नाही, असा सवालही त्यांनी केला.

मोदींचे परराष्ट्र धोरण म्हणजे राजकीय संकटांची मालिका – काँग्रेसची टीका

जैशचा म्होरक्या मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावामध्ये चीनने खोडा घातला त्यावरून काँग्रेसने भाजप सरकारवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परराष्ट्र धोरण म्हणजे राजनैतिक आपत्तींची मालिका आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. चीनने नकाराधिकाराचा पुन्हा एकदा वापर केल्याबद्दल काँग्रेसने चीनवरही ताशेरे ओढले आहेत.

मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावामध्ये खोडा घालण्यात आला तो दहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढय़ातील वाईट दिवस होता, असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

भारताच्या दहशतवादविरोधी लढाईला चीन-पाकिस्तानने धक्का पोहोचविला आहे, ५६ इंचाची छाती असलेली आलिंगननीती आणि झोका दिल्यानंतरही हे दोन्ही देश भारताकडे वाकडय़ा नजरेने पाहात आहेत आणि त्यामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परराष्ट्र धोरण म्हणजे राजनैतिक आपत्तींची मालिका आहे, असे सुरजेवाला यांनी ट्वीट केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp comment on congress party
First published on: 15-03-2019 at 01:29 IST