लंडन/ नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या काही सदस्यांच्या ब्रिटनमधील लोकप्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत काश्मीरमधील मानवाधिकारांच्या परिस्थितीबाबत चर्चा झाल्याबाबत ब्रिटनमधील विरोधी मजूर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन यांनी केलेल्या दाव्यानंतर भाजप व काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्धाला तोंड फुटले आहे. काँग्रेसने केलेल्या या ‘लज्जास्पद खोडसाळपणाबद्दल’ भाजपने गुरुवारी त्यांच्यावर जोरदार टीका केली आणि याबाबत स्पष्टीकरण मागितले.

त्यावर, स्वत:च्या अपयशापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप अशा प्रकारची ‘द्वेषपूर्ण वक्तव्ये’ करत असल्याचे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले. ब्रिटनच्या प्रतिनिधींची काँग्रेसच्या सदस्यांसोबत अतिशय फलदायी बैठक झाली आणि तीत आम्ही काश्मीरमधील मानवाधिकारांबाबत चर्चा केली, असे कॉर्बिन यांनी बुधवारी ट्विटरवर सांगितले.

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याबाबत भारत सरकारने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध मजूर पक्षाने ठराव संमत केल्यानंतर, ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या लोकांचा कॉर्बिन यांच्यावर दबाव आहे. या भागात आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाचे आवाहन करण्यात आलेला हा ठराव भारतविरोधी असल्याचे तेथील भारतीयांचे म्हणणे आहे.