वृत्तसंस्था, नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हिमाचल प्रदेशमधील हमीरपूर जिल्ह्यात विधानसभेच्या सर्वच्या सर्व पाच जागा भाजपने गमावल्या आहेत. या पराभवामुळे ठाकूर यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. अनुराग ठाकूर यांचे वडील, दोन वेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्रिपद भूषवलेले प्रेमकुमार धुमल यांना यावेळी भाजपने उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे त्यांच्या समर्थकांत मोठी नाराजी होती. त्याचा फटका या पराभवाच्या रुपाने बसल्याचे मानले जाते. धुमल यांचा २०१७ च्या निवडणुकीत हमीरपूरमधील सुजानपूरमधून पराभव झाल्यानंतर ते भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असताना त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाकूर यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात हिमाचल प्रदेशमध्ये दीर्घ काळ सहभागी झाले होते. ठाकूर यांनी हमीरपूर जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर प्रचार केला. जिल्ह्यातील समीरपूर गावात धुमल कुटुंबाचे वडिलोपार्जित घर आहे. तीनदा खासदारपद भूषवलेले ठाकूर यांचे ७८ वर्षीय पिता प्रेमकुमार धुमल यांनीही पक्षप्रचार केला होता. भाजपचा निवडणूक जाहीरनामा जाहीर होण्यापूर्वी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत धुमल म्हणाले होते, की किमान चतुर्थ श्रेणीच्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी निवृत्तिवेतन योजना परत सुरू करण्याची घोषणा करण्याविषयी त्यांनी पक्षाला सुचवले आहे. उलटपक्षी काँग्रेसने सर्व कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले. काँग्रेसच्या विजयामागे हे एक प्रमुख कारण असल्याचे मानले जाते.

अनुराग ठाकूर यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या अनेक लोकाभिमुख निर्णयांचा हिरिरीने प्रचार केला. मात्र त्याचा त्यांच्याच हमीरपूरमध्ये फारसा परिणाम झाल्याचे दिसले नाही. एक पद-एक निवृत्तिवेतन योजना (वन रँक वन पेन्शन), लष्करासाठी ‘बुलेट-प्रूफ जॅकेट’चे स्वदेशी उत्पादन, राफेल विमाने, तसेच मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील घटनेतील अनुच्छेद ३७० रद्द करणे यासारख्या मुद्दय़ांवर त्यांनी जोरदार प्रचार केला होता.

हमीरपूरमधील पाच विधानसभा जागांपैकी सुजानपूर येथे विद्यमान काँग्रेस आमदार राजिंदर सिंग यांनी ३९९ मतांनी विजय मिळवला. काँग्रेसचे सुरेशकुमार यांनी भोरंज येथील जागा जिंकली. या मतदारसंघात धुमल यांचे मूळ गाव समीरपूर आहे. येथे अत्यल्प ६० मतांनी भाजपचा पराभव झाला. या निवडणुकीतील हे अत्यल्प मताधिक्य ठरले. नादौनमध्ये काँग्रेसचे उमेदवार व मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सुखिवदर सुखू हे विजयी झाले. हमीरपूर विधानसभा मतदारसंघातील लढत काँग्रेसचे उमेदवार पुष्पिंदर वर्मा व अपक्ष म्हणून लढलेले काँग्रेसचे बंडखोर आशिष शर्मा यांच्यात लढत झाली. शर्मा यांनी १२ हजार ८९९ मतांनी विजय मिळवला. बरसर जागेवर जिल्ह्यातील सर्वाधिक विजयी फरकाने काँग्रेसचे इंदरदत्त लखनपाल विजयी झाले. ते १३ हजार ७९२ मतांनी विजयी झाले. येथील बंडखोरीचा फटका भाजपला बसला.

धुमल यांनी त्यांच्या मुलाखतीत बंडखोरीमुळे उद्भवलेल्या धोक्याचा इशारा दिला होता. ते म्हणाले होते, की एक मतदारही पक्षाच्या बाहेर गेल्याने पक्षावर नकारात्मक परिणाम होतो. जर बंडखोर असतील तर ते नक्कीच आपले मोठे नुकसान करतील. पण जेव्हा एखादा पक्ष सत्तेवर येण्याची शक्यता असते तेव्हा अनेकांना उमेदवारी हवी असते. हीच या निवडणुकीतील आव्हानात्मक व धोकादायक बाब ठरते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp defeated all seats anurag thakur district premkumar dhumal displeasure rejection of candidature ysh
First published on: 10-12-2022 at 00:59 IST