पणजीतील आप उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र

निवडून आलो तर भाजपमध्ये प्रवेश करणार नाही किंवा त्यांच्या सरकारला पाठिंबा देणार नाही, असे साक्षांकित प्रतिज्ञापत्र आम आदमी पक्षाचे पणजी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार वाल्मिकी नायक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सादर केले.

गोवा विधानसभेची निवडणूक २०१७ मध्ये झाली. त्यानंतर पाच आमदारांनी पक्ष बदलून भाजपला पाठिंबा तरी दिला किंवा त्या पक्षात प्रवेश केला. त्यामुळे मतदारांना पक्ष बदलणार नाही हे प्रचारावेळी पटवून देणे हे कठीण होत आहे. यासाठी प्रतिज्ञापत्राचा आधार घेतल्याचे नायक यांनी स्पष्ट केले.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पणजी मतदारसंघात १९ मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. भाजपने येथून माजी आमदार सिद्धार्थ कुंकळीकर यांना उमेदवारी दिली आहे. मी ज्याप्रमाणे प्रतिज्ञापत्र दिले, तसेच काँग्रेस उमेदवार बाबुश मोन्सेरात व गोवा सुरक्षा मंचचे सुभाष वेलिंगकर यांनीही द्यावे, अशी सूचना नायक यांनी केली आहे.

केवळ आमदार किंवा खासदार होण्याचा प्रश्न नाही तर राजकारणाचा दर्जा उंचावण्याची गरज नायक यांनी व्यक्त केली. दलबदल करणे किंवा आमदारांची फाटाफूट यातून राजकारणाचा स्तर घसरल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.