प्राप्तिकर विभागाकडून काँग्रेसची चार बँक खाती काही महिन्यांपूर्वी गोठवण्यात आली आहेत. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला एकही पैसा खर्च करण्यात येत नाही. आमच्याकडे आज दोन रुपयेही नाहीत, अशी खंत राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी बोलून दाखविली होती. त्यानंतर आज प्राप्तिकर विभागाकडून १७०० कोटींचा कर भरण्याची नोटीस देण्यात आली. यानंतर काँग्रेसचे खजिनदार अजय माकन यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी कडवी झुंज देऊ नये, यासाठी त्यांना पंगू करण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.

“भाजपाकडून कर दहशतवाद केला जात असून निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आर्थिक पंगू करण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असा आरोप याच पत्रकार परिषदेत काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी केला. तर भाजपा कर कायद्यांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप खजिनदार अजय माकन यांनी केला. आम्हाला जो नियम लावला जातोय, तोच जर भाजपाला लावला तर त्यांना ४,६०० कोटींची नोटीस प्राप्तिकर विभागाने द्यायला हवी, असेही अजय माकन म्हणाले.

‘आमच्याकडे आज दोन रुपयेही नाहीत’, काँग्रेसची खाती गोठवल्यानंतर राहुल गांधींचा संताप

प्राप्तिकर विभागाला काँग्रेसच्या चुका दिसत असतील तर भाजपाच्या चुका का दिसत नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केली. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार २०१७-१८ आणि २०२०-२१ या वर्षांमध्ये प्राप्तिकर भरण्यात विसंगती दिसल्यामुळे काँग्रेसला सदर नोटीस बजाविण्यात आली.

दुसरीकडे वर्ष २०१४-२०२१ या काळात एकूण ५२३.८७ कोटी रुपयांच्या बेहिशेबी व्यवहार प्रकरणी प्राप्तिकर विभागाकडून सदर नोटीस बजावण्यात आल्याचे सांगितले गेले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये ५२३.८७ कोटी रुपयांचे बेहिशेबी व्यवहार आढळून आले होते, असेही सांगितले जाते.

प्राप्तिकर लवादाचा काँग्रेसला धक्का

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मार्च महिन्यात काँग्रेस पक्षाने प्राप्तिकर लवादासमोर (ITAT) समोर केलेले अपील गमावले होते. काँग्रेसच्या बँक खात्यातून प्राप्तिकर विभागाने १३५ कोटी काढून घेण्यास स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र प्राप्तिकर लवादाने काँग्रेसची मागणी फेटाळून लावली. २२ मार्च रोजी प्राप्तिकर विभागाच्या शोधमोहिमेला स्थगिती देण्यासाठी काँग्रेसने उच्च न्यायालयात केलेली याचिकाही फेटाळण्यात आली. त्यामुळे जाणूनबुजून निवडणुकीच्या तोंडावर अशी कारवाई करण्यात येत आहे, तसेच आमच्या अपीलावर न्याय देण्यासाठी वेळ घालवला जात आहे, असा आरोप काँग्रेसने लावला.