लालकृष्ण अडवाणी किंवा मुरली मनोहर जोशींच्या सांगण्यावरुन नव्हे तर माझ्या वक्तव्यामुळे बाबरी मशीद पाडली गेली असे वादग्रस्त विधान भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रामविलास वेदांती यांनी केले आहे. विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल, महंत अवैद्यनाथ आणि माझ्या सांगण्यावरुनच बाबरी मशीद पाडली गेली असे विधान वेदांती यांनी केले आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी आम्ही तिघांनी बाबरी मशीद पाडा असे कारसेवकांना सांगितले होते तर लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे कारसेवकांना शांत व्हा असे समजावून सांगत होते असे वेदांती यांनी म्हटले आहे. मला माझ्या कृत्यासाठी प्राण अर्पावे लागले तरी आपण मागे हटणार नाही असे वेदांती यांनी म्हटले आहे.
वेदांती यांनी उल्लेख केलेले दोन नेते अशोक सिंघल आणि महंत अवैद्यनाथ यांचे निधन झाले आहे. वेदांती हे रामजन्म भूमी न्यासाचे सदस्य आहेत. भाजपच्या प्रमुख नेत्यांविरुद्ध कट रचण्याचा खटला दाखल करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर वेदांती यांचे हे विधान आले आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री उमा भारती, विनय कटियार यांच्याविरोधात कट रचण्याचा खटला भरा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. भाजपच्या मोठ्या नेत्यांना वाचवण्यासाठीच वेदांती यांनी हे विधान केल्याची चर्चा आहे.
याआधी, अयोध्येतील राम मंदिरासाठी प्राण पणाला लावण्याची तयारी आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दिली होती. रामजन्मभूमी चळवळीत सहभागी असल्याचा मला अभिमानच असून, अपराधीपणा वाटण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणे हे माझे स्वप्न असून, त्यासाठी तुरुंगात किंवा फाशीच्या शिक्षेसही सामोरे जाण्यास तयार आहे, असे उमा भारती म्हणाल्या. बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी कटाचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. कट किंवा षडयंत्र रचण्याचा प्रश्नच नाही. सगळे काही खुले होते. या चळवळीत सहभागी झाले याचा मला अभिमानच आहे असे उमा भारती म्हणाल्या होत्या.