बिहार विधानसभा निवडणूक हळूहळू रंगू लागली आहे. ऑनलाईन प्रचार सुरू झाला असून, जवळपास सर्वच पक्षांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपानंही उमेदवारी याद्या जाहीर केल्या आहेत. उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आल्यानंतर बंडखोरी उफाळून आली आहे. नऊ नेत्यांनी एनडीएच्या उमेदवारांविरोधातच दंड थोपटल्यानं भाजपानं नऊ नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपासोबत जदयू आणि इतर दोन छोटे पक्ष एनडीएतून निवडणूक लढवत आहेत. मात्र, एनडीएतील जागावाटपात अनेक जागा जदयू व मित्रपक्षांकडे गेल्यानं भाजपातील इच्छुक नेते नाराज झाले आहेत.

नाराज झालेल्या नेत्यांनी बंडखोरी केली असून, एनडीए उमेदवारांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत भाजपानं नऊ बंडखोर नेत्यांवर कारवाई केली आहे. नऊ नेत्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. यात राजेंद्र सिंग, रामेश्वर चौरसिया, उषा विद्यार्थी, रवींद्र यादव, श्वेता सिंग, इंदू कश्यप, अनिल कुमार, मृणाल शेखर, अजय प्रताप या बंडखोर नेत्यांचा समावेश आहे.

“आपण एनडीए उमेदवारांच्याविरोधात निवडणूक लढवत असून, यामुळे एनडीएसोबतच पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. हे पक्षाच्या शिस्तीविरूद्ध आहे. या कामामुळे तुम्हाला पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे,” असं भाजपाचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष संजय जायसवाल यांनी म्हटलं आहे.

भाजपाचे नेते व बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी पक्षातील नेत्यांना इशारा दिला होता. मात्र, त्यानंतरही उमेदवारी दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. “एनडीएच्या उमेदवारांविरोधात निवडणूक लढवू नये, अन्यथा त्यांना पक्षातून बाहेर काढलं जाईल,” असा इशारा मोदी यांनी दिला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp expels 9 leaders for contesting polls against nda candidates bmh
First published on: 13-10-2020 at 09:21 IST