PM Modis Mother AI video by Bihar Congress: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा उल्लेख झाला आहे. बिहार काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरून पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मातोश्रींचा एआयवर तयार केलेला व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदींच्या स्वप्नात त्यांची आई त्यांच्यावर ओरडताना दिसत आहे. या व्हिडीओनंतर भाजपाने काँग्रेसवर टीका केली असून अशा व्हिडीओमुळे काँग्रेसने खालचा स्तर गाठल्याचे म्हटले. तर काँग्रेसने सदर व्हिडीओ कुणाचाही अनादर करण्यासाठी केलेला नसल्याचे सांगितले.
काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना म्हटले, “आपल्या मुलांना चांगली शिकवणूक देणे हे पालकांचे कर्तव्य असते. त्या (पंतप्रधान मोदींच्या दिवंगत मातोश्री हीराबेन मोदी) फक्त आपल्या मुलाला शिक्षण देत आहेत. पण जर मुलाला (पंतप्रधान मोदी) असे वाटत असेल की, हे त्यांचा अनादर करणारे आहे. तर ही त्यांची समस्या आहे.”
भाजपाने काँग्रेसच्या व्हिडीओवर टीका करताना म्हटले की, यातून महिलांचा अवमान करण्यात आला असून काँग्रेसची पातळी खालावली आहे. भाजपाच्या या आरोपानंतर काँग्रेसच्या पवन खेरा यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
व्हिडीओमध्ये काय दिसले?
बिहार काँग्रेसने १० सप्टेंबर रोजी ३६ सेकंदाचा एआयने तयार केलेला व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात पंतप्रधान मोदी म्हणतात, “आजची मतदान चोरी झाली. आता झोपायला जातो.” यानंतर पंतप्रधान मोदींच्या स्वप्नात त्यांच्या मातोश्री दाखविल्या गेल्या. त्या म्हणतात, “तू नोटबंदीनंतर मला रांगेत उभे केलेस. माझे पाय धुण्याचे रिल बनवलेस आणि आता बिहारमध्ये माझ्या नावावर राजकारण करत आहेस. तू माझ्या अवमानाचे बॅनर लावत आहेस, पोस्टर छापत आहेस. तू पुन्हा बिहारमध्ये नाटक करत आहेस. राजकारणाच्या नावावर किती खाली पडशील.” यानंतर पंतप्रधान मोदी झोपेतून दचकून उठताना दाखवले गेले आहे.
भाजपाने काय टीका केली?
भाजपाचे प्रवक्ते शहजात पूनावाला यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, बिहार काँग्रेसने अतिशय घृणास्पद प्रकार केला असून सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. हा पक्ष आता गांधीवादी नसून गल्लीवादी बनला आहे. ‘महिला, मातृशक्ती का अपमान, यही काँग्रेस की पेहचान’, अशी हिंदीतील घोषणाही त्यांनी दिली. आधी बिहारला बिडीशी जोडून आणि आता दिवंगत व्यक्तीला अपमानित करून काँग्रेसने लाजिरवाणे कृत्य केले आहे.
काँग्रेसचे प्रत्युत्तर
काँग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा म्हणाले, आम्ही कुणाचाही अनादर केलेला नाही. भाजपा सहानुभूती मिळवण्यासाठी या मुद्द्याचा वापर करत आहे. या व्हिडीओमधील एखादा चुकीचा शब्द, कृती किंवा संकेत दाखवून द्या. कुठेही अनादर दिसत नाही. पंतप्रधान मोदी राजकारणात आहेत. त्यांनी प्रत्येक गोष्टीचा, विरोधी पक्षाच्या विनोदाचाही स्वीकार करायला हवा. तसेही या व्हिडीओत विनोद नसून सल्ला आहे.