गुजरात विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा काँग्रेस आणि भाजपमधील संघर्ष वाढताना दिसत आहे. भाजपच्या विकासाच्या दाव्यांना काँग्रेसने ‘विकास वेडा झाला आहे,’ असे म्हणत प्रत्युत्तर दिले होते. भाजप सरकारच्या काळात झालेल्या विकासकामांवर काँग्रेसकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्यानंतर आता अखेर भाजपने काँग्रेसला ‘विकास’ दाखवला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपमधील सोशल मीडियावरील संघर्ष तीव्र होताना पाहायला मिळतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींसह सोशल मीडियावर ‘विकास वेडा झाला आहे,’ असे कॅम्पन गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. अखेर भाजपने एका व्हिडिओच्या माध्यमातून काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे. या व्हिडिओमध्ये गुजराती अभिनेता हितू कनोडियाने राज्यात झालेल्या विकासकामांचा पाढाच वाचून दाखवला आहे. या व्हिडिओमध्ये साबरमतीच्या रिव्हर फ्रंटवर गप्पा मारणारे तिघेजण गुजरातच्या विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असताना हितू कनोडिया तिकडे येतो. यानंतर भाजप सरकारच्या काळात झालेल्या विकासाकामांची माहिती हितू त्या तरुणांना देतो.

शिक्षणापासून रस्तेनिर्मितीपर्यंत आणि स्वच्छतेपासून डिजिटल कारभारापर्यंतची सर्व माहिती आकडेवारीसह हितू कनोडियाने या व्हिडिओत सांगितली आहे. हितूची संपूर्ण माहिती संपेपर्यंत त्या भागात अनेक लोक जमतात. अखेर हितू तिथून निघून जात असताना, गुजरातच्या विकासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक तरुण, ‘तू नेमका आहेस कोण?’ असा प्रश्न त्याला विचारतो. या प्रश्नाला ‘मी विकास आहे, मी गुजरात आहे,’ असे उत्तर हितू देतो. भाजपकडून हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे.

याआधी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट विश्वचषक सामन्यावेळी टीव्हीवर दिसणाऱ्या ‘मौका मौका’ जाहिरातीचा आधार घेत काँग्रेसची खिल्ली उडवण्यात आली होती. विश्वचषक स्पर्धेत भारत कायमच सरस ठरतो आणि पाकिस्तानाला पराभव पाहावा लागतो. याच पार्श्वभूमीवर गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत २००२ पासून पराभूत होत असलेल्या काँग्रेसची व्हिडिओच्या माध्यमातून खिल्ली उडवण्यात आली होती. काँग्रेस समर्थक गुजरातमध्ये काँग्रेस जिंकेल आणि आपल्याला फटाके फोडायचा ‘मौका’ मिळेल, याची वाट पाहतो. मात्र काँग्रेस काही जिंकत नाही आणि त्या समर्थकाला फटाके फोडण्याचा ‘मौका’ काही मिळत नाही, असा व्हिडिओ तयार करण्यात आला होता. मात्र हा व्हिडिओ आपल्याकडून तयार करण्यात आला नसल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp hits back congress over vikas jibe ahead of gujrat assembly elections
First published on: 20-10-2017 at 14:07 IST