जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) सुरू असलेल्या देशविरोधी घडामोडी आणि डेव्हिड हेडलीच्या साक्षीतून इशरत जहाँ प्रकरणातील पुढे आलेल्या गोष्टींचे भांडवल करून जनतेपर्यंत पोहचण्यासाठी भाजपने ‘जन स्वाभिमान अभियान’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांच्या हल्ल्याला राष्ट्रवादाचा मुद्दा पुढे करून प्रत्युत्तर देण्याची भाजपची योजना आहे. ‘जेएनयू’च्या मुद्द्यावरून समाजातील एका मोठ्या गटाचा सरकारला पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपने याप्रकरणी कोणतीही बचावात्मक भूमिका घेण्याची गरज नसून पक्षाने हा मुद्दा आक्रमकपणे मांडला पाहिजे, असा निर्णय घेण्यात आल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले. त्यासाठी पक्षातर्फे गुरूवारपासून ‘जन स्वाभिमान अभियान’ राबविण्यात येणार असून या माध्यमातून भाजप कार्यकर्ते जेएनयू विद्यापीठात सुरू असलेल्या देशविरोधी कारवाया आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांच्याविरोधात जनमत एकटवण्याचा प्रयत्न करतील. यामध्ये राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार असून त्यासाठी नुकत्याच सियाचेनमध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांचा बलिदानाचा मुद्दा अग्रस्थानी असेल. यासंदर्भात संसदेपासून रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी पक्षाची भूमिका आक्रमकपणे मांडण्याची भाजपची रणनीती आहे.