पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकारच्या योजना लागू करण्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. “केंद्र सरकारची चांगली आयुष्यमान भारत योजना आजही पश्चिम बंगालमध्ये लागू नाही. अन्य सर्व राज्यांनी ही योजना लागू केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील दिल्लीमध्ये ही योजना लागू केली. परंतु ममता बॅनर्जी ही योजना पश्चिम बंगालमध्ये लागू करत नाहीत. त्या ही योजना का लागू करत नाहीत हे आम्हाला आणि पश्चिम बंगालच्या जनतेला ऐकायचं आहे. अशा बाबींमध्ये राजकारण करू नये. परंतु याव्यतिरिक्त राजकारण करायचं असेल तर तुम्हीच मैदान ठरवा त्या ठिकाणी दोन हात होऊन जाऊ दे,” अशा शब्दांत अमित शाह यांनी त्यांना आव्हान दिलं. अमित शाह यांनी आज पश्चिम बंगालमधील जनतेला व्हर्च्युअल रॅलीद्वारे संबोधित केलं. त्यांची ही सभा आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं महत्त्वाची मानली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“नरेंद्र मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाले. २०१९ पर्यंत त्यांनी कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर दुसऱ्या कार्यकाळाचं एक वर्ष पूर्ण झालं. त्यांनी देशाला सन्मान मिळवून दिला. सहा वर्षांमध्ये नव्या भारताची पाया रचला. परंतु ममता बॅनर्जी तुम्ही गेल्या १० वर्षांचा हिशोब द्या. परंतु बॉम्बस्फोट आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या मृत्यूचा आकडा सांगू नका. यावेळी पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन नक्की होणार,” असा विश्वासही शाह यांनी यानिमित्तानं व्यक्त केला. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस नेते आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. या कठीण काळात ५१ कोटी लोकांच्या खात्यात पैसे वर्ग केल्याचे ते म्हणाले.

“भाजपाला भलेही देशात ३०३ जागांवर विजय मिळाला असेल परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्यांला पश्चिम बंगालच्या १८ जागांवरील विजय महत्त्वाचा आहे,” असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालमध्ये मृत्यू पावलेल्या भाजपा कार्यकर्त्यांचीदेखील आठवण काढली. २०१४ पासून आतापर्यंत १०० पेक्षा अधिक भाजपाच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष करत आपले प्राण गमावले आहेत. मी त्यांच्या कुटुंबीयांना सलाम करतो. जेव्हा पश्चिम बंगालमध्ये परिवर्तनाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा या कार्यकर्त्यांचं नावही लिहिलं जाणार असल्याचे शाह म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader home minister amit shah criticize west bengal cm mamta banergee virtual rally jud
First published on: 09-06-2020 at 12:02 IST