सोनिया गांधी यांच्यावरुन भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ‘विदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही’, असे वादग्रस्त ट्विट त्यांनी केले आहे. तथ्यहिन विधान करुन देशाच्या अभिमानावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना देशातील जनता माफ करणार का?, असा सवालही त्यांनी केला आहे.

भाजपाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी शनिवारी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांचा थेट उल्लेख केला नाही. या ट्विटमध्ये ते म्हणतात, विदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही. हे ट्विट त्यांनी गांधी कुटुंबाला उद्देशून केल्याने सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका सुरु झाली. ‘आता तरी सुधरा, या मुद्द्यावरुन सोनिया गांधी यांनी यापूर्वीही भाजपाला धूळ चारली आहे. आता पुन्हा हा मुद्दा पुढे आणाल तर निवडणुकीत डिपोझिटही गमवाल’, असा सल्ला युजर्सनी विजयवर्गीय यांना दिला.

विजयवर्गीय यांनी आणखी एका ट्विटमधून राहुल गांधींवर टीका केली. ‘असा युवराज कधी नेता होऊ शकतो का जो दिवसाला ‘रात्र’ असल्याचे मान्य करायला लावेल. तो हरला तर इव्हीएम खराब, सैन्यालाही सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे द्यायला लावले आणि आता सुप्रीम कोर्टावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.तथ्यहिन गोष्टींनी देशाच्या अभिमानावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना देशातील जनता माफ करेल का?, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

राफेल करारावरुन सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. राफेल व्यवहारात गैरप्रकार नाही, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर विजयवर्गीय यांनी हे ट्विट केले आहेत.