भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे प्रत्युत्

नवी दिल्ली : ४०० कोटींना मारा गोळी, निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शनचा प्रकल्प अगदीच छोटा असून त्यामध्ये पीएमसी बँकेतील एक पैसाही आलेला नाही. आम्ही दमडीचीही चूक केलेली नाही. आम्ही गैरव्यवहार केल्याचे पुरावे असतील तर ठाकरे सरकारने आमच्या विरोधात चौकशी करावी, त्याविरोधात न्यायालयातही जाणार नाही, असे प्रत्युत्तर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिले.

शिवसनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांच्याविरोधात मंगळवारी मुंबईत आरोपांची राळ उठवली होती. त्यावर, राऊत हे कोविड केंद्रातील घोटाळय़ापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी २०१७ मध्ये केलेले आरोप पुन्हा करत आहेत. कोविड घोटाळय़ामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व संजय राऊत घाबरलेले आहेत.

काळय़ा यादीत टाकलेल्या कंपनीला पुण्यातील कोविड केंद्राचे कंत्राट दिल्यामुळे रुग्णांना त्रास झाला. या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन घोटाळय़ाची कागदपत्रे उघड करू, असा इशारा सोमय्या यांनी दिला.

सोमय्या यांचे पुत्र नील यांच्या मालकीच्या निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शनमध्ये पीएमसी बँक घोटाळय़ातील आरोपी राकेश वाधवान हे भागीदार आहेत. या प्रकल्पासाठी सोमय्यांनी ४०० कोटींची जमीन साडेचार कोटींमध्ये विकत घेतल्याचा असल्याचा आरोप राऊत यांनी केला  होता.

मात्र हे सर्व आरोप सोमय्या यांनी पूर्णपणे फेटाळले. नील वा माझा वाधवानशी संबंध नाही, पीएमसी बँकेशीही संबंध नाही. वास्तविक, पीएमसी बँकेतील घोटाळा मीच उघड केला होता. आम्हाला तुरुंगात टाकायचे तर खुशाल टाका. आम्ही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत, आम्ही घाबरत नाही, असे सोमय्या म्हणाले.

कर्जतमधील देवस्थानच्या जमिनी खरेदी व्यवहारावरून ठाकरे कुटुंबीयांना त्रास दिला जात असल्याच्या संजय राऊत यांच्या आरोपावर, यासंबंधी रश्मी ठाकरे याचे बंधू श्रीधर पाटणकर यांनी बोलावे, असे सोमय्या म्हणाले. हिंदूू देवस्थानची जमीन मुस्लीम व्यक्तीच्या मालकीची झाली मग, ती पाटणकरांच्या नावे झाली. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने कागदपत्रे दिलेली आहेत, असा दावा सोमय्या यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अलिबागमध्ये ठाकरे कुटुंबीयांनी १९ बंगले खरेदी केलेले नाहीत, असा दावा राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता. या मुद्दय़ावरून सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबावर आरोप केले होते. हे बंगले खरेदी केले नसतील तर या बंगल्यांचा मालमत्ता कर ठाकरे कुटुंबीयांकडून का भरला जात आहे, असा प्रश्न सोमय्या यांनी केला.