बिहार निवडणुकीत एनडीएचा दणदणीत विजय झाला आहे. २०० हून अधिक जागा भाजपा आणि जदयूला मिळाल्या आहेत. दरम्यान या विजयानंतर लालूप्रसाद यादव यांचा पक्ष आणि कुटुंब दोन्ही फुटलं आहे. लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्यची पक्षातून आणि कुटुंबातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर आता भाजपा नेत्याने खोचक पोस्ट लिहिली आहे. तेजस्वी यादव आणि औरंगजेब यांच्यात काय साम्य आहे असा प्रश्न या नेत्याने विचारला आहे.

लालू प्रसाद यांच्या कुटुंबात ‘यादवी’

बिहार निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये ‘यादवी’ माजल्याचं चित्र आहे. तर बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबात फूट पडली आहे. लालूप्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव, संजय यादव आणि रमीझ यांनीच आपल्याला कुटुंबातून बाहेर काढल्याचा आरोप केला आहे.

रोहिणी आचार्य यांची प्रतिक्रिया नेमकी काय?

“माझं आता कुठलंही कुटुंब नाही. तुम्ही मला प्रश्न विचारु नका. तेजस्वी यादव, संजय यादव आणि रमीज यांना प्रश्न विचारा. माझं आता कुटुंब नाही. मला या तिघांनी कुटुंबातून हाकललं आहे. कारण या तिघांनाही जबाबदारी घ्यायची नाही. सगळं जग म्हणतं आहे जो चाणक्य असेल त्याला तुम्ही प्रश्न विचारणार का? कार्यकर्ता चाणक्याला प्रश्न विचारतो आहे. सगळा देश चाणक्याला प्रश्न विचारतो आहे की पक्षाची अशी अवस्था का झाली? संजय, तेजस्वी आणि रमीझ यांचं नाव घेतलं तर तु्म्हाला घरातून हाकललं जाईल, बदनाम केलं जाईल, तुम्हाला चपलेने मारलं जाईल.” अशी संतप्त प्रतिक्रिया रोहिणी आचार्य यांनी पाटणा विमानतळावर दिली. दरम्यान भाजपाचे नेते निशिकांत दुबे यांनी दोन पोस्ट केल्या आहेत आणि खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हटलं आहे निशिकांत दुबे यांनी?

१) औरंगबेज आणि तेजस्वी यादव यांच्यात काय साम्य आहे?

२) लालू प्रसाद यादव यांना त्यांच्या हयातीतच त्यांची जादू संपताना पाहण्यास मिळाली. मुलगा बहिणीला चपलेने मारायला निघाला आहे. हे सामाजिक परिवर्तन आहे की लालू प्रसाद यादव यांच्या चारित्र्याचं अधःपतन? असे प्रश्न निशिकांत दुबे यांनी उपस्थित केले आहेत.

रोहिणी आचार्य यांची आजची पोस्ट काय?

“काल एका मुलीला, एका बहिणीला, एका विवाहित महिलेला, एका आईला अपमानित करण्यात आलं, घाणेरड्या शिव्या देण्यात आल्या. मला मारण्यासाठी चप्पल उगारण्यात आली. पण मी माझ्या स्वाभिमानाशी तडजोड केली नाही, सत्याचा त्याग केला नाही. फक्त आणि फक्त यामुळे मला अपमान सहन करावा लागला. काल एका मुलीने तिच्या आईवडिलांना आणि बहिणींना असहाय्यतेनं सोडलं, मला माझं माहेरचं घर सोडावं लागलं, मला अनाथ बनवण्यात आलं. तुम्ही सर्वांनी कधीही माझ्या मार्गावर जाऊ नका. रोहिणीसारखी मुलगी किंवा बहीण कोणत्याही घरात जन्माला येऊ नये”, असं रोहिणी आचार्य यांनी म्हटलं आहे.