केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांना नोटीस पाठवली आहे. गडकरी यांनी केलेल्या एका विधानाचा चुकीचा अर्थ लावून तसा व्हिडीओ समाजमाध्यमांवर टाकण्यात आला, असा दावा या नोटिशीत करण्यात आलाय.

“व्हिडीओच्या मदतीने तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न”

मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ १९ सेकंदांचा असून त्याचा उपयोग बदनामी तसेच भाजपाच्या नेत्यांत संभ्रम निर्माण करण्यासाठी केला जातोय, असं या नोटिशीत म्हणण्यात आलंय.

naseem khan letter to congress
काँग्रेसला धक्का! माजी मंत्री नसीम खान यांनी मोठा आरोप करत प्रचाराला दिला नकार
Election Commission cautious stance on Narendra Modi Rahul Gandhi statements
भाषणे नेत्यांची; नोटिसा पक्षाध्यक्षांना! मोदी, राहुल यांच्या विधानांबाबत निवडणूक आयोगाची सावध भूमिका
Jayant Patil on Amit Shah
“पक्ष फोडणाऱ्यांनीच ठरवलं कोण नकली, पण जनता..”, जयंत पाटील यांची अमित शाहांवर टीका
sangli Mahavikas Aghadi
मविआची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर होताच कॉंग्रेस संतप्त, बैठकीत पुढील निर्णय – आमदार सावंत

“व्हिडीओशी छेडछाड करण्यात आलीय”

गडकरी यांनी जारी केलेल्या नोटिशीत “काँग्रेसच्या मायक्रोब्लॉगिंग साईट एक्सवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओचा वेगळा अर्थ काढण्यात आलाय. या व्हिडीओशी छेडछाड करण्यात आलीय. या व्हिडीओच्या माध्यमातून करण्यात आलेला दावा हा संदर्भहीन असून त्याला कोणताही आधार नाही,” असं म्हणण्यात आलं आहे.

काँग्रेसने पोस्ट केला अर्धवट व्हिडीओ

काँग्रेसने शेअर केलेल्या १९ सेकंदांच्या या व्हिडीओत नितीन गडकरी हे गरीब, शेतकरी, ग्रामीण भागातील नागरिक यांच्याविषयी बोलताना दिसत आहेत. “ग्रामीण भागातील नागरिक, गरीब लोक, कामगार, शेतकरी हे दु:खी आहेत. ग्रामीण भागात चांगले रस्ते नाहीत. पिण्यासाठी पाणी नाही. चांगली रुग्णालये नाहीत. उत्तम प्रतिच्या शाळा नाहीत,” असे गडकरी या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत. काँग्रेसने शेअर केलेल्या या व्हिडीओत गडकरींचे पूर्ण विधान दिलेले नाही. वरील विधानांच्या अगोदर नितीन गडकरी हे शहरी भागातील स्थलांतरावर बोलले आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी यासाठी एनडीए सरकारकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांविषयी गडकरी बोलत आहेत. मात्र गडकरींची ती विधाने काँग्रेसने ट्वीट केलेल्या व्हिडीओत नाहीत.

“प्रतिष्ठा खराब करण्यासाठी केलेलं कृत्य”

“शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओचा पूर्ण संदर्भ माहीत असूनही मुद्दामहून व्हिडीओतील विधानांचा अर्थ लपवून तो हिंदी कॅप्शनसहित पोस्ट करण्यात आला. प्रतिष्ठा खराब करण्यासाठी द्वेषभावनेने करण्यात आलेले हे कृत्य आहे,” असं या नोटिशीत म्हणण्यात आलंय.

“तीन दिवसांत माफी मागा, अन्यथा…”

दरम्यान, या नोटिशीच्या माध्यमातून गडकरी यांनी काँग्रेसला हा व्हिडीओ हटवण्यास सांगितलंय. तीन दिवसांच्या आत लेखी स्वरुपात माफी मागावी, अशीही मागणीही गडकरी यांनी केलीय. माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही गडकरींनी या नोटिशीच्या माध्यमातून दिलाय.