काँग्रेस नेत्याचा पुतळा जाळण्यापासून रोखल्यामुळे भाजपा नेत्याने पोलीस हवालदाराला कानशिलात लगावली आहे. एका पोलीस हवालदाराने कर्नाटकचे भाजपा नेते आणि माजी आमदार ए. पापरेड्डी यांना निषेध रॅलीदरम्यान माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पुतळ्याचे दहन करण्यापासून रोखले होते. यामुळे संतापलेल्या माजी आमदारांनी पोलीस हवालदाराला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये, पापरेड्डी यांनी रायचूर पश्चिम पोलीस ठाण्यात तैनात असलेला हवालदार राघवेंद्रला धक्काबुक्की केली आणि थापड मारताना दिसत आहे.
२६ ऑक्टोबर रोजी सिंदगी येथे जाहीर सभेत दलितांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्या विरोधात भाजपा अनुसूचित जाती मोर्चाने आयोजित केलेल्या राज्यव्यापी निषेधादरम्यान ही घटना घडली. वाद वाढू लागल्यावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत पापरेड्डी आणि हवालदाराला भांडण्यापासून रोखले. नंतर पत्रकारांशी बोलताना पापरेड्डी म्हणाले, “साध्या वेशभूषेतील माणूस पोलीस हवालदार आहे हे मला माहीत नव्हते. मला वाटलं की तो भाजपचा कार्यकर्ता आहे. हवालदाराने पुतळा हिसकावून नाल्यात फेकल्यामुळे मी चिडलो,” असं त्यांनी सांगितलं. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिलंय.
आपल्या कृत्याबद्दल माफी मागणार का, असे विचारले असता माजी आमदार म्हणाले, “मी माफी का मागू? कॉन्स्टेबलवर कारवाई व्हायला हवी होती. त्याने नम्र असायला पाहिजे. तसेच तो साध्या कपड्यांमध्ये येऊन आमच्यात उभा का राहिला होता,” असं त्यांनी विचारलं.