भाजपा नेते तजिंदरपाल सिंग बग्गा यांना पंजाब पोलिसांनी आज दिल्लीतून अटक केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बग्गा यांच्याविरोधात पटियालामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्च महिन्यात विधानसभेत बोलताना द काश्मीर फाईल्स चित्रपट करमुक्त न करण्याबाबत केजरीवाल यांनी वक्तव्य केले होते, त्या वक्तव्यावरून बराच गदारोळ निर्माण झाला होता. यावर बग्गा यांनी ट्विट करताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्यानंतर बग्गा यांच्यावर चिथावणीखोर विधाने करणे, धार्मिक शत्रुत्वाला प्रोत्साहन देणे आणि धमकावल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बग्गा यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. छत्तीसगडमध्येही बग्गा यांच्यावर एफआयआर नोंदवण्यात आला होता. त्यावेळी बग्गा यांच्यावर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप होता.

बग्गा केजरीवालांबद्दल काय म्हणाले?

एफआयआर नोंदवल्यानंतर तजिंदरपाल यांनी ट्विट करून म्हटलं होतं की, “एक नाही तर १०० एफआयआर होऊ द्या, पण केजरीवाल जर काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला खोटं म्हणत असतील तर मी बोलेन, केजरीवाल जर काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडावर हसले तर मी बोलेन. त्यासाठी मला जे काही परिणाम भोगावे लागतील ते भोगायला मी तयार आहे. मी केजरीवालांना सोडणार नाही, मी बोलत राहीन,” असं बग्गा यांनी ट्वीटमध्य म्हटलंय.

बग्गांच्या अटकेला भाजपाचा विरोध

बग्गा यांच्या अटकेचा दिल्ली भाजपाने विरोध केला आहे. भाजपा नेते कपिल मिश्रा यांनी केजरीवाल सरकारवर निशाणा साधला आहे. तेजिंदर पाल बग्गा यांना पंजाब पोलिसांच्या ५० कर्मचार्‍यांनी अटक करून त्यांच्या घरातून नेले. पण बग्गा अशा गोष्टींना घाबरणार नाहीत, अशा आशयाचे ट्विट मिश्रा यांनी केले आहे.

काय आहे प्रकरण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मार्च महिन्यात दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाईल्स’ हा काश्मीरी पंडितांवरच्या अत्याचारावर आधारीत असणारा चित्रपट प्रदर्शित झाला. काही राज्यांनी हा चित्रपट करमुक्त केला. दिल्लीतही हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी भाजपा सरकारने केली होती. या मागणीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘चित्रपट करमुक्त करण्याऐवजी तो युटुयुबवर टाका, सर्वांनाच पाहता येईल’ असे विधान केले होते. ज्यामुळे बराच गदारोळ माजला होता. याच विधानावरूनच भाजपा नेते तजिंदरपाल यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला होता.