नवी दिल्ली : ‘‘काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे भलेही राजकीयदृष्टय़ा निरुपयोगी असू शकतात. परंतु त्यांनी संसदेचे काम बंद पाडून सभागृहाच्या कामकाजाचा वेळ वाया घालवत निरुपयोगी ठरवू नये,’’ अशा शब्दांत भाजपने बुधवारी राहुल गांधी यांची खिल्ली उडवली. वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) जीवनावश्यक वस्तू-खाद्यपदार्थाच्या दरवाढीच्या व महागाईच्या मुद्दय़ावर विरोधकांच्या विरोधामुळे संसदेचे कामकाज बुधवारी विस्कळीत झाले. त्या पार्श्वभूमीवर राहुल यांना भाजपने टीकेचे लक्ष्य केले.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. जीवनावश्यक खाद्यपदार्थावर ‘जीएसटी’ लागू करणे आणि वाढत्या महागाईच्या मुद्दय़ांवरून काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केलेल्या विरोधामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज विस्कळीत झाले आहे. देशासाठीच्या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा टाळल्याचा आरोप सरकार आणि विरोधक दोघांनीही एकमेकांवर केला आहे.
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडत म्हटले, की आपल्या राजकीय कारकिर्दीत राहुल यांनी संसदीय कामकाज आणि परंपरेचा सातत्याने अनादर केला आहे. अन् आता ते लोकसभेच्या कामकाजावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. २००४ ते २०१९ दरम्यान अमेठीचे खासदार म्हणून राहुल गांधी यांनी संसदेत एकही प्रश्न विचारलेला नाही आणि जेव्हा हा मतदारसंघ सोडून ते केरळच्या वायनाडमधून खासदार झाले, तेव्हा २०१९ च्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्यांची उपस्थिती ४० टक्क्यांपेक्षा कमी होती. त्यांनी सभागृहात कधीही कोणतेही खासगी विधेयक मांडले नाही. त्यांचे वारंवार परदेशांत जाणे हा त्यांच्याच पक्षात चिंतेचा विषय बनला असल्याचे सांगत इराणी यांनी राहुल यांच्या परदेश दौऱ्यांचा समाचार घेतला.
संसदीय कामकाज-परंपरेचा अनादर करणाऱ्या राहुल यांनी आता संसदीय कामकाज किंवा उपयोगी चर्चाच होऊ द्यायच्या नाहीत, असे ठरवून त्यासाठी ते समर्पणवृत्तीने काम करते आहेत. ते राजकीयदृष्टय़ा निरुपयोगी असतीलही, परंतु मी. त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी संसदेची उत्पादकता रोखण्याचा प्रयत्न करू नये. संसद हे भारतीयांच्या आशा-आकांक्षांचे प्रतीक आहे. देशातील प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचे असलेल्या विषयांवर संसदेत चर्चा व्हावी, अशी देशातील जनतेची इच्छा आहे, असेही स्मृती इराणी म्हणाल्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीमधून राहुल गांधींचा पराभव स्मृती इराणी यांनी केला होता.
काँग्रेसची विध्वंसक वृत्ती : पीयूष गोयल
केंद्रीय मंत्री व भाजपचे राज्यसभेतील सभागृह नेते पीयूष गोयल यांनी बुधवारी संसदेत व्यत्यय आणल्याबद्दल काँग्रेसवर टीका केली आणि म्हटले, की काही जीवनावश्यक वस्तूंवर ‘जीएसटी’ लावल्याबद्दल चर्चा करण्यापासून सरकार पलायन करत नाही. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन या करोनातून बऱ्या झाल्यानंतर या मुद्दय़ांवर चर्चा होऊ शकते. गोयल यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले, की लोकशाहीसंदर्भात काँग्रेसची विध्वंसात्मक भूमिका आहे. संसदेच्या कामकाजात कोण सर्वाधिक व्यत्यय आणेल, याबाबत विरोधकांत स्पर्धा सुरू आहे. यासाठी त्यांनी काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांच्या ‘ट्विट’चा संदर्भ दिला. रमेश यांनी केलेल्या ‘ट्विट’मध्ये म्हटले होते,की काँग्रेस संसदेचे कामकाज रोखण्यात यशस्वी झाले. राज्यसभेत काँग्रेसच्या नेत्यांनी वाढती महागाई व जीवनावश्यक खाद्यपदार्थावर ‘जीएसटी’ लावण्यावर चर्चेची मागणी केली होती. सरकारने त्याला नकार दिला. राज्यसभेचे कामकाज दुपारी दोनपर्यंत तहकूब करण्यात आले.
खाद्यपदार्थावरील ‘जीएसटी’ मोदींना मागे घ्यावा लागेल- राहुल गांधी
नवी दिल्ली : अनेक खाद्यपदार्थावर वस्तू-सेवा कर (जीएसटी) लागू केल्याबद्दल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बुधवारी टीका केली. पंतप्रधानांनी जनतेचे ऐकलेच पाहिजे. त्यांना हा निर्णय मागे घ्यावा लागेल, असेही राहुल यांनी नमूद केले आहे.
राहुल यांनी ‘ट्विट’ केले, की ‘‘महागाईने होरपळत असलेल्या जनतेसाठी ‘गब्बर’ची पाककृती : अन्न कमी तयार करा, कमी खा व आश्वासनांच्या फोडणींनी भूक भागवा.’’ आपल्या मित्रांनी व्यक्त न केलेल्या भावनाही समजून घेणाऱ्या पंतप्रधानांना जनतेच्या भावनाही समजून घ्याव्याच लागतील व या जीवनावश्यक वस्तू-खाद्यपदार्थावरील ‘जीएसटी’ मागे घ्यावाच लागेल. यात पीठ, पनीर, दही या लेबल असलेल्या वेष्टनांकित आणि लेबल लावलेल्या खाद्यपदार्थाचा समावेश आहे. त्यावर पाच टक्के ‘जीएसटी’ लावण्यात आला आहे.