गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय आणि भाजपचे सचिव अमित शहा यांची उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य प्रभारी व समन्वयक यांच्या रविवारी प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीमध्ये भाजपचे आंध्र प्रदेशचे वजनदार नेते बंडारू दत्तात्रय यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, केरळचे प्रभारीपद देखील दत्तात्रय यांच्याकडे देण्यात आले आहे. यापूर्वी ते वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते.
उत्कृष्ट संघटक म्हणून ओळखल्या जाणा-या अमित शहांवर, लोकसभेच्या सर्वात जास्त ८० जागा असणा-या उत्तर प्रदेशची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
लवकरच निवडणुकीला सामो-या जाणा-या मध्यप्रदेशची जबादारी पक्षाचे महत्वाचे नेते अनंत कुमार यांच्यावर देण्यात आली असून त्याच्याकडील बिहारची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. भाजपचे राज्यसभेतील सदस्य जे.पी. नड्डा यांच्याकडे काही महिन्यांत विधानसभा निवडणुकीला सामो-या जाणा-या छत्तीसगडची जबाबदरी देण्यात आली आहे. राजनाथ सिंह यांच्या जवळचे समजले जाणारे व उत्तर प्रदेश भाजपचे माजी अध्यक्ष रमापती राम त्रिपाठी यांच्याकडे झारखंडची जबाबदारी देण्यात आली असून महाराष्ट्राची जबाबदारी राजीव प्रताप रूडी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.