पीटीआय, बंगळूरु : बांधकाम कंत्राटदाराच्या आत्महत्येप्रकरणी सुरुवातीला राजीनामा देण्यास ठामपणे नकार देणारे कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री व पंचायत राजमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी अखेर पदावरून पायउतार होणार असल्याचे गुरुवारी जाहीर केले. आज, शुक्रवारी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामापत्र सोपवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कंत्राटदार आत्महत्या प्रकरणात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उडुपी येथील बांधकाम कंत्राटदार संतोष पाटील यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ईश्वरप्पा यांच्याविरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. रस्ते बांधकामापोटी चार कोटींच्या देयकातील ४० टक्के रकमेची मागणी ईश्वरप्पा यांनी केल्याचा आरोप संतोष पाटील यांनी केला होता.  या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही राजीनामा न देण्याची भूमिका ईश्वरप्पा यांनी बुधवारी घेतली होती. पाटील यांच्या मृत्यू प्रकरणाचे कारस्थान पोलीस चौकशीतून उघड होईपर्यंत प्रतीक्षा करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ईश्वरप्पा यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगत त्यांचा राजीनामा घेण्याचे संकेत दिले होते.

 ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेसने जोरदार निदर्शने केली. भाजपवर दबाव वाढू लागल्याने अखेर ईश्वरप्पा यांनी राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. मला या पदापर्यंत पोहोचण्यास मदत करणाऱ्या भाजपच्या राज्य आणि केंद्रातील नेत्यांचा विचार करून मी पदत्यागाचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp minister resigns contractor suicide case karnataka ysh
First published on: 15-04-2022 at 00:02 IST