बंगळुरुत भाजपा आमदाराच्या मुलीने वाहतुकीचे नियम तोडल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. बीएमडब्ल्यूमधून प्रवास करत असलेल्या मुलीने सिग्नल तोडल्यानंतर पोलिसांनी थांबवलं असता त्यांच्यासोबत वाद घातला. यावेळी तिने स्थानिक पत्रकार आणि कॅमेरामनसोबतही हुज्जत घातल्याची माहिती आहे.
भाजपा आमदार अरविंद निंबावली यांची मुलगी बीएमडब्ल्यू चालवत होती. नियमाचं उल्लंघन केल्याने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला रोखलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिने सीटबेल्टही लावलेला नव्हता.
पोलिसांनी थांबवल्यानंतर मुलीने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी तिने आपण कोण आहोत हे सांगत पोलिसांवर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला. “मला जायचं आहे, कार थांबवू नका, ओव्हरटेक केल्याबद्दल तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करु शकत नाही. ही आमदाराची गाडी आहे. आम्ही बेदरकारपणे चालवत नव्हतो. अरविंद निंबावली माझे वडील आहेत,” असं मुलगी पोलिसांना सांगत होती.
पोलिसांना मात्र तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. वाद सुरु असल्याने तिथे लोकांची मोठी गर्दी जमली होती.
मुलीच्या नावे ९ हजाराचा दंड आतापर्यंत जमा झाला होता. यासोबत आताचे १००० रुपये असा एकूण १० हजारांचा दंड तिला भरण्यास सांगण्यात आला. यावेळी मुलीने आपल्याला घरी जाऊ देण्याची विनंती करताना आपल्याकडे दंड भरण्यासाठी पैसे नसल्याचाही दावा केला. पण शेवटी तिच्यासोबत असणाऱ्या मित्राने १० हजारांचा दंड भरला आणि त्यानंतर पोलिसांनी तिला जाऊ दिलं. मात्र या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.