उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुकांचं वारं आत्तापासूनच वाहू लागलं आहे. प्रत्येक पक्ष आपापली राजकीय समीकरणं जुळवण्याच्या तयारीला लागला असून मतदारांची मर्जी सांभाळण्याची तयारीही सुरू आहे. ही निवडणूक भाजपाची प्रतिष्ठा पणाला लावणारी निवडणूक मानली जात आहे. २०१७ मधला भाजपाचा विजय आता जुनी गोष्ट झाली असून आता नव्याने पक्षाला व्होटबँक सांभाळावी लागणार आहे. ब्राह्मण मतदारांना आपल्याकडे वळवणं हे भाजपासमोर असलेलं मोठं आव्हान मानलं जात आहे. त्यामुळे या मतदारांची मनधरणी करण्यासाठी भाजपा नेते सज्ज झाल्याचं दिसून येत आहे.

भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी भाजपा नेत्यांनी आज त्यांची भेट घेतली. काल म्हणजेच रविवारी दिल्लीत झालेल्या बैठकीमध्ये ब्राह्मण मतदारांना आपल्या बाजूला ओढण्यासाठी भाजपाच्या ४ सदस्यीय समितीची स्थापनाही करण्यात आली आहे. या समितीमध्ये ब्राह्मण समुदायाचे काही मोठे नेते आहेत. माजी केंद्रीय मंत्री शिव प्रताप शुक्ला, भारतीय जनता युवा मोर्चाचे अभिजात मिश्रा, डॉ. महेश शर्मा आणि राम भाई मोकारिया यांचा समावेश आहे. सुरुवातीला ह्या समितीतले सर्व सदस्य सगळ्या विधानसभा मतदारसंघांचे दौरे करतील आणि ब्राह्मण मतदारांपर्यंत पोहोचतील. पुढे काही दिवसांमध्ये दिल्लीत पुन्हा एकदा बैठक होईल आणि नव्याने नियोजन करण्यात येईल.

उत्तरप्रदेशात ब्राम्हण मतदार महत्त्वाचे का?

नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तरप्रदेशात साधारण १४ टक्क्यांपर्यंत व्होटबँक ब्राह्मण मतदारांची असल्याचं मानलं जातं. सर्वच राजकीय पक्षांची या व्होटबँकवर नजर असते. राजकीय जाणकारांच्या मते, ब्राह्मणांच्या पाठिंब्यामुळे कोणत्याही पक्षाचा मार्ग सुकर होतो, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ब्राह्मण जात ही बाकीच्या जातींपेक्षा जास्त बोलकी मानली जाते. यावेळीही समाजवादी पक्षापासून ते बहुजन समाज पक्षापर्यंत प्रबोधनपर संमेलन होत आहे, तर प्रियंका गांधीही योगी सरकारवर ब्राह्मणांच्या दडपशाहीचा मुद्दा सातत्याने मांडत आहेत.